Published On : Thu, Nov 8th, 2018

अग्निशमन विभागाच्या तत्परतेने फटाक्यांमुळे लागलेल्या आगींवर नियंत्रण

Advertisement

डागा ले-आऊटमधील मोठी दुर्घटना टळली : लहान-मोठ्या २० आगी विझविल्या

नागपूर : ऐन दिवाळीच्या दिवशी फटाक्यांमुळे लागलेल्या आगींवर नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ नियंत्रण मिळवित कोट्यवधींचे होणारे नुकसान टाळले. डागा ले-आऊट येथे स्केटिंग रिंकजवळ लागलेल्या आगीत पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांची समयसूचकता आणि अग्निशमन विभागाची तत्परता यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शहरात ७ आणि ८ नोव्हेंबर या दोन दिवसांत विविध २० ठिकाणी लागलेल्या आगींवर अग्निशमन विभागाने तत्काळ नियंत्रण मिळविल्याने मोठे नुकसान टळले. या घटनांमध्ये कुठलीही प्राणहानी झाली नाही. डागा ले-आऊट कॉर्पोरेशन कॉलनीतील स्केटिंग ग्राऊंडला लागून प्रशासकीय कार्यालय होते. कालांतराने नागपूर सुधार प्रन्यासने सदर जागा रेस्टारंटकरिता दिली. रेस्टॉरंट मालकाने तेथे बांबूचे आणि ताटव्यांचे बांधकाम केले. डागा नगर नागरिक मंडळाने त्याला विरोध केला. त्याबाबत तक्रारी दिल्या. तक्रारीवरून नासुप्रने ते बांधकाम पाडले. मात्र, रेस्टॉरंट मालकाने ते सामान तेथेच साठवून ठेवले. ७ नोव्हेंबर रोजी या सामानाला फटाक्यांमुळे आग लागली. बाजूलाच असलेले डागानगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष तथा पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी गांभीर्य ओळखून तत्काळ अग्निशमन विभागाला सूचना केली. क्षणाचाही विलंब न लावता अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविले. जरा उशीर झाला असता तर संपूर्ण डागानगर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले असते, असे श्री. चंद्रपाल चौकसे यांनी सांगितले.

अन्य घटनांमध्येही अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे मोठे नुकसान टळले. धरमपेठ ट्राफिक पार्क वाय प्वाईंटजवळ सिलेंडरला आग लागून २५ हजारांचे नुकसान झाले. व्यंकटेश मंदिर देवाडियाजवळ कचऱ्याला आग लागली. लकडगंज अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी या आगीवर नियंत्रण मिळविले. सुभाष नगर रोड केळकर मानव हॉस्पीटल येथे पहिल्या माळ्यावर आग लागली. येथील १२ पुरुष आणि दोन महिलांना सुरक्षित स्थळी हलविण्यात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत सुमारे २५ हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान टळले. अभ्यंकर नगर व्हीएनआयटी चौकात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली, त्यावरही अग्निशमन विभागाने तत्परतेने नियंत्रण मिळविले. क्रीडा चौकात पकोड्याच्या ठेल्याला आग लागली. त्यावरही नियंत्रण मिळविण्यात यश आले.

वैभव नगर, जरिपटका पोलिस ठाण्यासमोरील कचरा, सदर छावणी मस्जिद जवळ घराला लागलेली आग, पांडे ले-आऊटमधील प्रणव ३ अपार्टमेंटमध्ये दिव्यामुळे लागलेली आग, व्हेरायटी चौकात गेसन्ससमोर कचऱ्याला लागलेली आग, गुरुदेव नगरातील राजीव गांधी सभागृहासमोरील कचऱ्याला लागलेली आग, वर्धमान नगरातील रेसीडेन्स हॉस्पीटलसमोरील कचऱ्याला लागलेली आग, छोटा ताजबाग एम्पायर बारजवळ कचऱ्याला लागलेली आग, गांधीबाग पोलिस क्वॉर्टरजवळील ट्राफिक सिग्नलजवळील कचऱ्याला लागलेली आग, मोतीबाग पाचपावली रेल्वे गेटजवळील कचऱ्याला लागलेली आग, गीतांजली टॉकीजजवळील कचऱ्याला लागलेली आग, वंजारी नगर येथे भंगार ऑटोला लागलेली आग आणि गोरेवाडा वॉटर फिल्टर प्लान्टजवळ कचऱ्याला लागलेली आग आदींवर यशस्वीरीत्या नियंत्रण मिळविण्यात आले. अग्निशमन विभागाने मनुष्यबळाचा अभाव असतानाही योग्य नियोजन केले. कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या.

प्रशिक्षणार्थींनाही अग्निशमन केंद्रावर तैनात ठेवले. कार्यालयीन लिपिकांच्याही रजा रद्द करीत रात्र पाळीत कामावर बोलाविले. योग्य नियोजनामुळेच घटना घडताच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ऐन दिवाळीच्या दिवसांत कर्तव्य बजावत शहरातील आगीमुळे होणारी हानी टाळण्यात बजावलेल्या कामगिरीबद्दल अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे. पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी स्वत: महापालिका कार्यालयात येऊन अपर आयुक्त राम जोशी यांची भेट घेतली आणि अग्निशमन विभागाच्या तत्परतेचे कौतुक केले.

नागपूर महानगरपालिकेचा अग्निशमन विभाग हा कर्तव्यतत्पर असून शहरात कुठेही हानी होणार नाही, याबाबत दक्ष असतो. दिवाळीसारख्या सणात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवित केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे, असे मनपाच्या अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती लहुकुमार बेहते यांनी म्हटले आहे. जीवावर उदार होऊन शहराचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे समितीच्या उपसभापती वर्षा ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. नागरिकांनी दाखविलेल्या समयसूचकतेबद्दल आणि वेळीच अग्निशमन विभागाला दिलेल्या घटनांच्या माहितीबद्दल जागरुक नागरिकांचेही मनपाचे आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी आभार मानले आहे.

दक्षता हाच आग नियंत्रणावर उपाय : महापौर
दिवाळीच्या दिवसांत आगीच्या घटना घडत असतात. मात्र, याबाबत मनपाच्या अग्निशमन विभागातर्फे वेळोवळी जनजागृती करण्यात आली. दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. यामुळेच यंदाच्या दिवाळीत तुरळक घटना वगळता कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. तत्परता दाखविणारे अग्निशमन विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि वेळीच विभागाला सूचना देणारे चंद्रपाल चौकसे यांच्यासारखे दक्ष नागरिक यांचे अभिनंदन, या शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा गौरव केला.

अग्निशमन विभागाची तत्परता अभिनंदनीय : चंद्रपाल चौकसे
आम्ही नागरिक म्हणून आमची जबाबदारी पार पाडतच असतो. परंतु यंत्रणेने तितक्याच तत्परतेने प्रतिसाद देणे हे ही महत्त्वाचे असते. डागा ले-आऊटमध्ये लागलेल्या आगीत मी स्वत: फोन केल्यानंतर क्षणात अग्निशमन विभागाचे वाहन आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचणे, हे अभिनंदनीय आहे. अशा यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचा आम्ही नागरी सत्कार घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे आमचेही कर्तव्य बजावू, अशा शब्दात डागानगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष आणि पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी अग्निशमन विभागाचा गौरव केला.

Advertisement
Advertisement