Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Apr 11th, 2021

  जिल्ह्यातील शासकीय व खाजगी इस्पितळांचे फायर ऑडिट करावे

  रुग्णांची माहिती देण्यासाठी समित्या स्थापन करण्याचे निर्देश

  उद्रेक लक्षात घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे

  नागपूर : सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. या इंजेक्शनसह रुग्णालयातील बेड आणि लसीच्या उपलब्धतेसंदर्भात सर्व शासकीय -अशासकीय यंत्रणांनी आपसात अधिक समन्वय करुन प्रभावी व्यवस्थापन करावे असे आदेश आज पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी येथे दिले.

  ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी तर शहरासाठी महानगरपालिका आयुक्त यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणी व पुरवठ्यावर नियंत्रण ठेवून गरजूना ते उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.पालकमंत्री म्हणाले की, महामारीचे संकट असतांना रेमडेसिवीर हाच एकमेव रामबाण उपाय समजून खासगी डॉक्टर त्याचा अवाजवी वापर करत आहेत. मात्र रुग्णांना केवळ गंभीर स्थितीतच योग्य प्रमाणात रेमडेसिवीरचा वापर झाला पाहीजे. रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी रूग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा दिसून येतात. रुग्णांच्या नातेवाईकांकडून वाढीव किंमती उकळण्यात आल्याचे काही ठिकाणी निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी व महानगरपालीका आयुक्त यांनी समन्वय ठेवावा.अन्न व औषध प्रशासन विभागानेही दक्ष राहून याबाबत आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्याचे निर्देश डॉ.नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.

  या बैठकीला आमदार विकास ठाकरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, वनामती प्रशिक्षण संसथेच्या संचालक मनीषा खत्री, महापालिकेचे अपर आयुक्त जलज शर्मा, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अजय केवलिया, माहिती व जनसंपर्क संचालक हेमराज बागुल, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेन्द्र पातुरकर तसेच पोलीस, महसूल, आरोग्य, शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, महानगरपालिका आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, टास्क फोर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.

  जिल्हयातील ग्रामीण भागात ताप ,सर्दी अशी लक्षणे दिसताच लोकांचे दुर्लक्ष करण्याच्या सवयीमुळे रूग्ण गंभीर अवस्थेत शहरात धाव घेत आहेत. काल काही गंभीर रूग्ण अमरावती येथील सुपर स्पेशालीटी हॉस्पीटलला पाठवावे लागले.

  रूग्णांची वाढती संख्या ही आरोग्य यंत्रणेवर ताण वाढवत आहे.म्हणूनच संसर्ग होताच गाव परिसरातील डॉक्टरांमार्फत तालुकास्तरावरील नियंत्रण कक्षाकडे माहिती जाणे गरजेचे आहे. रूग्णांच्या संख्येच्या तुलनेत प्रभावी बेड व्यवस्थापन करण्यात यावे,असेही निर्देश त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले.ग्रामीण भागात शांतता समितीच्या धर्तीवर तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांनी तालुकास्तरावर कार्यरत डॉक्टरांची बैठक घेवून त्यांच्याकडून संशयीत रूग्णांची माहिती घ्यावी. शहरातही झोननिहाय अशाच पध्दतीची समन्वय यंत्रणा करावी असे त्यांनी यावेळी सूचित केले.

  लसीकरण वाढविणे हाच सध्या करोना प्रतिबंधाचा मार्ग आहे. करोना निर्बधांच्या काळात लसीकरणाला जाण्यासाठी बस उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना केले.

  महामारीच्या या कठीण प्रसंगी शासकीय वैदयकीय महाविदयालयात नव्याने रूजू झालेल्या मात्र कर्तव्यपालनात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे त्यांनी बजावले.

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय आणि अनुसंधान केंद्र येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या प्रक्रीयेची माहिती त्यांनी घेतली. ही तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सोबतच बाजुच्या परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

  खासगी हॉस्पिटलमधील प्रतिनिधींशी पालकमंत्र्यांनी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली.खासगी हॉस्पिटलमधील देयके तपासण्याच्या कामावर त्यांनी समाधान व्यक्त केले. देयकांमध्ये पारदर्शकता ठेवावी. महानगरपालिकेच्या अंकेक्षकाकडून अंकेक्षित केलेले देयकच रूग्णांना दयावे, असे ते म्हणाले.

  रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणाऱ्या ऑक्सिजन सप्लाय सिस्टीमचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले.

  खासगी व शासकीय रूग्णालयांचे फायर ऑडीट करण्यात यावे.भंडारा सामान्य रूग्णालयानंतर काल वाडी येथील दुर्घटना घडली. उन्हाळयाच्या दिवसात आग लागण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हयातील खासगी व शासकीय रूग्णालयांचे फायर ऑडीट करण्यात यावे. तिथे कार्यरत डॉक्टर ,नर्स यांना आग लागल्यानंतर करावयाच्या सुरक्षा उपाययोजनांची माहिती दयावी . यासंबंधी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिले.

  कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त घातक आहे. साधारणपणे पुढील 20 ते 25 दिवसात याची तीव्रता भीषण होवू शकते असे संकेत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगीतले. मास्क व शारीरिक अंतरासोबतच कोविडविषयक नियम आणि निर्बधांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145