Published On : Wed, Jan 9th, 2019

निर्माणाधीन इमारतीला आग, सहा जखमी, दोन गंभीर

महापौर नंदा जिचकार,स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केली पाहणी

नागपूर : कस्तुरचंद पार्कनजिक रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या किंग्ज वे मार्गावरील निर्माणाधीन इमारतीला लागलेल्या आगीत आठ जण जखमी झाले. त्यातील दोन गंभीर असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच सुमारे १२ अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन पथकाने तत्परता दाखवून वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने लगतच्या इमारतींना धोका झाला नाही.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, अग्निशमन समितीचे सभापती लहुकुमार बेहेते, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष आग लागलेल्या जागेची पाहणी केली. प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी महापौरांना आगीविषयी संपूर्ण माहिती देत आग नियंत्रणात आल्याचे सांगितले. किंग्ज वे मार्गावर किंग्ज वे हॉस्पीटलच्या इमारतीचे कार्य सुरू आहे. याच इमारतीचा मागील भाग परवाना ट्रस्टचा आहे. त्यांचे ऑडिटोरियमचे कार्य सुरू होते. या कार्यादरम्यान एकाच वेळी गॅस वेल्डींगसह अनेक कामे सुरू होते.

दोन वाजताच्या सुमारास इमारतीमधून काळाकुट्ट धूर निघताना दिसला. त्याचवेळी अग्निशमन विभागाला दूरध्वनीवरून घटनेची माहिती मिळाली. अग्निशमन विभागाचे पथकातील सुमारे १२ वाहने घटनास्थळी दाखल झाले. निर्माणाधीन इमारतीमध्ये अग्निशमन नियमाप्रमाणे पाईप, शॉवर पाईपचे काम झालेले होते.

मात्र पाण्याच्या पाईपला जोडले नव्हते. पथकाने त्याला अग्निशमन विभागाच्या वाहनांमधून पाण्याचा पाईप जोडून पाणी सुरू केले. प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वात अग्निशमन विभागाच्या सुमारे ८० जवानांनी प्रत्यक्ष आग लागलेल्या ठिकाणी इतर वाहनातूनही पाण्याचा मारा केला. लवकरच आगीवर नियंत्रण मिळाले. मात्र, प्रत्यक्ष आग लागलेल्या ठिकाणी उशिरापर्यंत धूर आणि उग्र वासामुळे कार्यात अडचणी येत होत्या. ऑडिटोरियममध्ये फोमच्या खुर्च्या जळाल्याने त्यांचा धूर झाल्याचे प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले.

आग लागल्यानंतर ते कामावर असलेल्या मजुरांनी धावपळ केली. यामध्ये दोन मजूर गंभीर असून त्यांची नावे कळू शकली नाही. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अन्य जखमींमध्ये उमेश येरपुडे, योगेश डेहनकर, गजेंद्र शर्मा (२५), धरमीन वर्मा (४०), उमाबाई भंडारी (४०), जानबाई निर्मलकर (४५) यांचा समावेश असून त्यांना मेयो रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

तत्पर अग्निशमन विभागामुळे आगीवर नियंत्रण : महापौर
आगीची घटना ही मोठी आहे. इमारत निर्माणाधीन असल्याने आणि तेथे केवळ मजूर असल्याने मोठी दुर्घटना टळली. मजुरांनीही वेळीच प्रसंगावधान दाखवून आपले जीव वाचवले. याचदरम्यान अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे आगीवर वेळीच नियंत्रण मिळविता आले. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी धूर, उष्णता आणि गुदरमण्यासारखी परिस्थिती असतानाही अग्निशमन विभागाचे जवान तेथे आत शिरून परिस्थितीवर नियंत्रण मिळवित आहे.

जीवावर उदार होऊन सेवा करणाऱ्या अग्निशमन विभागातील सर्व अधिकारी, स्थानाधिकारी व जवानांचे कार्य कौतुकास आणि अभिनंदनास पात्र आहे. ज्या कोणी घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन विभागाला दिली, त्यांचेही मनपाच्या वतीने आभार मानते. अशा दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले.

Advertisement
Advertisement