Published On : Mon, Jan 22nd, 2018

गोरेवाडा जंगलात पुन्हा भीषण आग

नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय परिसरातील इंडियन सफारी भागात सोमवारी दुपारी पुन्हा एकदा भीषण आग लागली. या आगीत ४० हेक्टर क्षेत्र जळाले.

स्थानिक नागरिकांनुसार ही आग दाभा बायपासकडील सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या वनक्षेत्रात लागली. परंतु दुपारी १२.३० वाजेपर्यंत वन कर्मचाऱ्यांना या आगीची माहिती मिळाली नव्हती. घटनास्थळावरून बराच वेळपर्यंत धूर आणि आगीच्या ज्वाळा निघत असल्याने वन कर्मचाऱ्यांचे लक्ष गेले. त्यांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. यानंतर १२.५० वाजता अग्निशमन विभागाला आगीची सूचना देण्यात आली.

अग्निशमन विभागाने एक गाडी तातडीने रवाना केली. आगीची भीषणता लक्षात घेता दुपारी १.२७ वाजता दुसरी गाडीही पाठवली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. तेव्हापर्यंत जवळपास ४० हेक्टर क्षेत्र जळाले होते. दहा दिवसांपूर्वीसुद्धा गोरेवाडा जंगलातील काटोल रोडवरील परिसरात आग लागली होती. तेव्हा जवळपास १०० हेक्टर क्षेत्र जळाले होते.

त्याच्या दोन दिवसांपूर्वीसुद्धा गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील रेस्कू सेंटर परिसरात आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळविले असले तरी प्राणिसंग्रहालय पूर्ण होण्यापूर्वीच या परिसरात वारंवार आगीच्या घटना होत असल्याने यामागे काही घातपात तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. या दिशेने वन अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.