Published On : Fri, Oct 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांना आर्थिक मदत; महाराष्ट्रातील ९१ लाख खात्यांवर १,८३५ कोटींचा निधी

Advertisement

दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांना आर्थिक मदत; महाराष्ट्रातील ९१ लाख खात्यांवर १,८३५ कोटींचा निधी

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्यांतर्गत महाराष्ट्रातील ९१ लाख १२ हजार ७६५ शेतकऱ्यांना एकूण १ हजार ८३५ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमातून ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत हस्तांतरित केली.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानातून ऑनलाइन सहभाग घेतला. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना प्रधानमंत्री मोदी यांनी शेती क्षेत्रातील विविध योजनांचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत देण्याऐवजी शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन व्यवस्था, पशुपालन आणि शेतीशी संबंधित पूरक व्यवसायांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून आतापर्यंत सुमारे चार लाख कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. खतांच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय किमतींचा परिणाम शेतकऱ्यांवर होऊ नये, यासाठी सरकारने १६ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय गहू आणि धान उत्पादकांना गेल्या १२ वर्षांत किमान आधारभूत किमतीच्या माध्यमातून २४ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. पीक विमा योजनेतूनही दहा वर्षांत दोन लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसानभरपाई देण्यात आल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.

Advertisement

शेतीसाठी लागणारा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने पीएम कुसुम योजनेतून सौरपंपांचे वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे १२ लाख सौरपंप देण्यात आले असून, त्यातून डिझेलची मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. हवामानातील बदलांना तोंड देण्यासाठी बियाण्यांच्या तीन हजार सुधारित जातीही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पशुधनाच्या संरक्षणासाठी राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १५० कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. आठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या पशुधनाला या मोहिमेचा फायदा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.