Published On : Tue, Mar 27th, 2018

अखेर बंदोबस्तात ओला कॅब सुरु


नागपूर: बहुप्रतिक्षीत ओला कॅब नागपूर रेल्वे स्थानकाहून मंगळवारपासून सुरू करण्यात आली. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास या खासगी वाहनांचे प्रत्यक्षात संचालन सुरू झाले. खासगी वाहनामुळे प्रवाशांच्या सोयी सुविधेत भर तर पडली. मात्र, आॅटोरिक्षा चालकांचा रोजगार संकटात सापडत असल्याने त्यांच्यात संतापाची लाट पसरली आहे. यावेळी आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांचा बंदोबस्त होता.

प्रवाशांच्या सोयी सुविधेत वाढ होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने खासगी वाहनासाठी रितसर निविदा काढल्या. जानेवारी महिण्यात ओला कॅबला परवानगी देण्यात आली. कंपनीने रेल्वेकडे रितसर रक्कमही भरली असून नागपूर रेल्वे स्थानकाच्या ड्राप अ‍ॅण्ड गो च्या तिसºया रांगेत ओला कॅब साठी प्लॅटफार्म तयार करण्यात आले, पिवळे पट्टे मारुन १० वाहनांसाठी ही जागा राखीव ठेवली. शिवाय ओलाचे फलकही लावण्यात आले. कंपनीतर्फे दोन कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहेत. हे कर्मचारी प्रवाशांकडून बुकींग करतील. मोबाईलमध्ये प्रवाशाची माहिती घेऊन ज्या कॅबमध्ये प्रवाशाला जायचे आहे, त्याला आणि संबधीत प्रवाशाच्या मोबाईलवर ही माहिती पाठविली जाईल. यात प्रवाशाचे नाव, पत्ता, कुठून कुठे जायचे, भाडे आणि चालकाचे नाव असेल. प्रवाशांना उच्च दर्जाच्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी भारतीय रेल्वेचा धोरणात्मक निर्णय असला तरी स्थानिक आॅटोचालकात प्रचंड रोष खदखदत आहे.

खासगी वाहनामुळे आॅटोचालकांचा व्यवसाय संकटात आला असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या खासगी वाहनाला नागपूर रेल्वे स्थानकावर दिलेली परवानगी रद्य करा या प्रमुख मागणीसाठी लोकसेवा प्रिपेड आॅटो चालक – मालक टॅक्सी संघटनेचे अंसारी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापकांना निवेदन दिले. तसेच रेल्वे मंत्री आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना निवेदन पाठविले. ओला कॅबला दिलेली परवानगी रद्द करावी, अन्यथा रेल्वे स्थानकावर कुटुंबासह बेमुदत आंदोलन करण्याचा ईशाराही त्यांनी निवेदनाव्दारे रेल्वे प्रशासनाला दिला होता. मात्र, आज प्रत्यक्षात ओला कॅब सुरू झाल्यावर अनुचित प्रकार घडला नाही. परंतु आॅटोचालकांचा रोष लक्षात घेता गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी स्टेशन व्यवस्थापक दिनेश नागदेवे, उप स्टेशन व्यवस्थापक प्रवीण रोकडे, वाणिज्य व्यवस्थापक राजीव भालेराव उपस्थित होते.

आॅटो चालकांमध्ये रोष
रेल्वे प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करून ही सेवा सुरू केली असल्याचे आॅटो चालकांचे म्हणणे आहे. मुळात या स्थानकावर फक्त १० टॅक्सीची परवानगी देण्यात आली होती. प्रत्यक्षात स्टेशनवर १४ गाड्या आल्या आहेत. त्याचप्रमाणे येथून बॅटरी कार म्हणजे ज्यांना स्थानिक परवाना आहे त्याच धावतील, असेही ठरले होते. मात्र, राष्ट्रीय परवाना असलेल्या गाड्या येथून धावत असल्याने आॅटो चालक संतप्त असल्याचे प्रीपेड लोकसेवा आॅटोचालक संघटनेचे अध्यक्ष अल्ताफ अंसारी, उपाध्यक्ष अशफाक खान, असलम अंसारी यांनी म्हटले आहे. दरम्यान उद्या या संबंधात आॅटो चालक डीआरएमना भेटून निवेदन देणार आहेत.