Published On : Sat, Aug 21st, 2021

हृदय प्रत्यारोपणाचे प्रमाण वाढविण्यासाठी अवयवदान नोंदणी अर्ज भरा

Advertisement

‘अवयवदान संवाद’ फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात तज्ज्ञांचे आवाहन

नागपूर : देशामध्ये आजच्या स्थितीत वर्षाला सुमारे २५० ते ३०० हृदय प्रत्यारोपण केले जाते. २०१३पर्यंत ही संख्या केवळ १६ इतपर्यंतच होती. हृदय प्रत्योरोपणाच्या संख्येमध्ये काही वर्षांमध्ये वाढ झालेली असली तरी प्रत्यक्षात देशात ५० हजार लोकांना हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे. एकूणच ही दरी खूप मोठी असून ती हृदयदानाकरिता आपल्या सर्वांच्या पुढाकाराने भरणार आहे. हृदय प्रत्यारोपणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येकाने अवयवदानासाठी नोंदणी अर्ज भरा, असे आवाहन हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ.निकुंज पवार आणि हृदय रोगतज्ज्ञ डॉ.अनिल जवाहिरानी यांनी केले.

अवयवदान जनजागृती सप्ताहानिमित्त नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अवयवदान संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात शुक्रवारी (ता. २०) हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ.निकुंज पवार आणि हृदय रोगतज्ज्ञ डॉ.अनिल जवाहिरानी यांनी सहभाग घेतला होता. यावेळी तज्ज्ञांनी हृदयदान व प्रत्यारोपण’ या विषयावर संवाद साधला आणि नागरिकांच्या शंकांचे निरसन केले.

निसर्गाने आपल्याला अनमोल शरीर दिले आहे ते आपण जीवंत नसतानाही इतरांच्या कामी येउ शकते. त्यामुळे अमूल्य अशा या शरीराला जाळून किंवा पुरून नष्ट करू नका. एक शरीर जवळपास ८ जणांचा जीव वाचवू शकतो. त्यामुळे आपले शरीर आपण हयात नसतानांही कुणाला तरी जीवनदान देउन जीवंत राहू द्या, असेही आवाहन दोन्ही तज्ज्ञांनी केले. हृदय हे मानवी शरीरातील महत्वाचे अवयव आहे. हृदय निकामी झालेल्या व्यक्तीला मेंदूमृत व्यक्तीकडून हृदय घेता येतो. मात्र हृदयदान आणि प्रत्यारोपण ही क्रिया अतिशय जलद आहे. केवळ ८ तासामध्ये दात्याकडून हृदय काढून ते गरज असलेल्या व्यक्तीला प्रत्यारोपण करावे लागते. अनेकदा प्रत्यारोपणासाठी लागणा-या प्रवासाच्या वेळेमुळेच हृदय प्रत्यारोपण होउ शकत नसल्याचा प्रकार घडतो. हृदय प्रत्यारोपणासाठी झोनल ट्रान्सप्लाँट कॉर्डिनेशन कमिटीद्वारे प्राधान्य ठरविले जाते. त्यानुसार ते संबंधित रुग्णाला प्रत्यारोपीत केले जाते. यासाठी वेळेवर दाता मिळणे आवश्यक आहे. कमिटीकडे वाढणारी प्रतीक्षा यादी वाढत जात असल्याने आज मोठ्या प्रमाणात हृदयदानासाठी पुढे येण्याची गरज आहे, असेही डॉ.निकुंज पवार आणि डॉ.अनिल जवाहिरानी म्हणाले.

हृदय प्रत्यारोपणानंतरही रुग्णाने अतिशय जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. आहार, सौम्य व्यायाय याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मद्यपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे पूर्णत: बंद करणे अत्यावश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला हृदय प्रत्यारोपणाची गरज आहे. मात्र तो पुढेही आपले व्यसन बंद करण्यास तयार नसल्यास अशा व्यक्तीला हृदय प्रत्यारोपण करण्याऐवजी ते दुस-या एखाद्या गरजूला देउन त्याचा जीव वाचविण्यास कमिटीद्वारे प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे हृदयरोगी असो वा इतर सर्वांनीच मद्यपान व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन पूर्णत: टाळावे, असेही आवाहन त्यांनी केले. अवयवदान अथवा हृदयदान याविषयी अनेकांच्या मनपात अनेक संभ्रम आणि शंका असतात. मात्र हृदयदान किंवा हृदय प्रत्यारोपण ही प्रक्रिया सोपी नाहीच. यामध्ये अनेक कायदेशीर बाबींसह मानवी हक्कांच्या सुद्धा बाबी आहेत. यासर्वांच्या कक्षेत राहूनच व सर्व प्रक्रिया पार पाडूनच कुठलीही अवयवदानाची प्रक्रिया पार पाडली जाते, असेही डॉ.निकुंज पवार आणि डॉ.अनिल जवाहिरानी यांनी सांगितले.