नागपूर : कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात आज, ११ ऑक्टोबर रोजी अश्विन नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी देवीच्या स्वयंभू दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटे ४ वाजतापासूनच भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. माता जगदंबेच्या दर्शनासाठी दूरदूरून भाविक कोराडीत दाखल होत आहेत.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांसाठी देवीच्या स्वयंभू दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ५ ते १० वाजेपर्यंत हे दर्शन सुरू राहणार असल्याने पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था, सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि इतर आवश्यक सुविधांवर विशेष लक्ष दिले जात आहे.
११ ते २० ऑक्टोबरदरम्यान चालणाऱ्या या नवरात्रोत्सवात सुमारे साडे 5 हजार अखंड मनोकामना ज्योती प्रज्वलित करण्यात येणार आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गर्दीचे नियोजन करण्यासाठी मंदिर प्रशासनाने भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शक्यतो सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळा टाळून दुपारच्या वेळी दर्शनासाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने कोराडी मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.





