नागपूर : सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची मागणी वाढत असतानाच भेसळ आणि नियमबाह्य अन्नविक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नागपूरमध्ये विशेष मोहीम सुरू केली आहे. शहर आणि परिसरातील विविध आस्थापना, गोदामे व अन्ननिर्मिती केंद्रांवर तपासणी करत FDAच्या पथकाने संशयित अन्नसाठ्यावर कारवाई केली. या मोहिमेत तब्बल २५ लाख रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त करण्यात आला.
उंझा रायपूर ट्रान्सपोर्ट येथील आमसर अँड कंपनीच्या ठिकाणी कृत्रिम रंगाचा वापर केल्याचा संशय असलेले तब्बल १,९९७.६ किलो चक्रफूल आढळून आले. ६ लाख २२ हजार ४९२ रुपये किमतीचा हा साठा ताब्यात घेण्यात आला. न्यू नागपूर कोल्ड स्टोरेजमधील समधा कॉर्पोरेशन आणि मंत्री ट्रेडिंग प्रा. लि. येथून लेबलिंगमध्ये त्रुटी आढळल्याने ३६ किलो मनुके जप्त करण्यात आले.
कळमना धान्य बाजारातील दोन व्यापाऱ्यांकडून नियमांचे पालन न करता पॅक केलेला १०,४३६ किलो सॉर्टेक्स तांदूळ जप्त करण्यात आला. या मालाची किंमत ५ लाख ८२ हजार ४१६ रुपये असल्याचे सांगण्यात आले.
हिंगणा येथील सुपीरियर बिस्किट्स अँड प्रॉडक्ट्समधून कॅफिनयुक्त पेयांचा साठा, तर खामला येथील जयशंकर किराणा स्टोअर्समधून ५६८ किलो संशयित गूळ ताब्यात घेण्यात आला. दोन्ही कारवायांमध्ये अनुक्रमे २ लाख ३७ हजार आणि २ लाख १४ हजार ८० रुपयांचा माल जप्त झाला.
कामठी आणि सावनेर येथे विनापरवाना अन्ननिर्मिती तसेच लेबलिंगच्या नियमांचे उल्लंघन आढळले. तेथून कॉर्न फ्लोअर, कस्टर्ड पावडर, मेझ स्टार्च आणि तांदळाचा साठा जप्त करण्यात आला.
दरम्यान, वकीलपेठ येथून ४७९.२ किलो संशयित क्रीम, तर इतर डेअरी व्यावसायिकांकडून दूध, रसगुल्ला, साखर, खवा आणि गायीचे तूप जप्त करण्यात आले आहे. या सर्व नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार असून अहवालानंतर संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती FDAने दिली आहे.





