
नागपूरच्या कामठी-कन्हान महामार्गावर कथित गो-तस्करीचा प्रकार समोर आला आहे. २८ सप्टेंबरच्या मध्यरात्री वाहनातून मोठ्या संख्येने गोवंशांची अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचा आरोप आहे. बजरंग सेना, बजरंग दल, गौरक्षक आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने वाहन थांबवून १८ गोवंशांची सुटका करण्यात आली. मात्र, यावेळी ७ गोवंश मृतावस्थेत आढळून आले.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबरच्या रात्री सुमारे २ ते ३ वाजताच्या दरम्यान जबलपूर रोडवरील कामठी-कन्हान महामार्गावर ही कारवाई करण्यात आली. वाहनात तब्बल २५ गोवंश दाटीवाटीने बांधून नेले जात असल्याचे सांगण्यात आले. रेस्क्यू केलेल्या १८ गोवंशांना धंतोली येथील श्री नागपूर गोरक्षण सभेत दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर गौरक्षकांनी कथित गो-तस्करीच्या नेटवर्कवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केवळ वाहन चालकांवर कारवाई न करता या प्रकरणामागील कथित मुख्य सूत्रधारांपर्यंत तपास पोहोचवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच गो-तस्करी रोखण्यासाठी विशेष एसआयटी स्थापन करावी, प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र गो-रक्षा सेल तयार करावा, वाहन पकडल्यानंतर घटनास्थळी तातडीने पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गौरक्षकांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.




