नागपूर : प्रेमसंबंधाला विरोध केल्याने नागपुरात मेव्हण्यावर चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी दहन घाटाजवळ ही घटना घडली असून, पोलिसांनी या प्रकरणात दोघा आरोपींना अटक केली आहे. गंभीर जखमी अवस्थेत मेव्हणा खासगी रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयताळा परिसरातील रहिवासी आशीष हरसे याला आपल्या बहिणीचे महेश काले याच्याशी असलेले प्रेमसंबंध मान्य नव्हते. या संबंधाला आशीषने विरोध दर्शवला होता. ही बाब संबंधित युवतीने आपल्या प्रियकर महेश कालेला सांगितली. त्यानंतर महेश कालेने आपल्या मित्र अनुराग ढोक यांच्या मदतीने आशीष हरसेवर हल्ला केला.
श्मशानघाटाजवळ थांबवून हल्ला-
मंगळवारी रात्री दिघोरी दहन घाटाजवळ आशीष एकट्याने असताना दोघा आरोपींनी त्याला अडवले. सुरुवातीला त्यांनी मारहाण केली आणि त्याने विरोध केल्यावर महेश कालेने चाकूने थेट पोटावर घाव घातला. आशीष रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ वाठोडा पोलीस ठाण्यात कळवले.
पोलीसांची तातडीची कारवाई-
वाठोडा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी आशीषला रुग्णालयात हलवले. त्याच्या जबाबावरून आरोपी महेश काले आणि अनुराग ढोक या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
आरोपींवर कारवाई सुरू, जखमीची प्रकृती चिंताजनक
जखमी आशीषवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या माहितीनुसार त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांकडून या घटनेमागील सखोल तपास केला जात आहे. या हल्ल्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध सुरू आहे.