Published On : Fri, Sep 6th, 2019

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमरण उपोषण

Advertisement

कामठी:-आज गुरुवार दि. ५ सप्टेबर ला आमरण उपोषणाला दोन दिवस झाले. प्रा. अवंतिका लेकुरवाळे आणि दिनेश ढोले आमरण उपोषणासाठी तसेच इतर शेतकरी साखळी उपोषणासाठी बसले आहेत. अजूनही शासन व प्रशासनाने दखल घेणे तर सोडाच परंतु अजूनपर्यंत नियमानुसार वैद्यकीय तपासणीसाठी कोणतीही टिम आंदोलनकर्त्यांची प्राथमिक तपासणी करण्यासाठी आली नाही. त्यावरून प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल किती बेजबाबदार पने वागत आहे हे दिसून येते.

आज शेतकऱ्यांनी कामठी, कुही आणि नागपूर ग्रामीण च्या तहसिलदार यांना संबधित उपोषणाच्या मागण्यांविषयी निवेदन दिले. आणि कामठी व कुही येथे भव्य प्रमाणात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नारे-निदर्शने करून सरकारच्या भूमिकेचा जाहीर निषेध केला. नागपूर जिल्ह्याचा विजेचा वापर हा फक्त ४०० मेगावॅट असतांना मात्र एका नागपूर जिल्ह्यात ७२०० मेगावॅट इतकी विजनिर्मिती होते. याचाच अर्थ एकूण निर्माण होणाऱ्या विजेच्या ९५.४४% विज हि पुण्या-मुंबईसारख्या शहरांना पुरविली जाते. व त्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी विकणाऱ्या निर्दयी सरकारविषयी फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.

नागनदी आणि पोहरा नदीचे ३३० MLD पाणी थर्मल पावर स्टेशन ला दिले आहे तसेच १५० MLD पाणी NTPC ला देण्याची चर्चा प्रस्तावित आहे. यामुळे नागनदी व पोहरा नदी कोरडी पडेल आणि कुही तसेच कामठी तालुक्यातील ४९ गावातील हजारो शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न निर्माण होईल.

आज उपोषणस्थळी बहुद्देशीय तिरीळे कुणबी संघ नागपूर यांच्या शिष्टमंडळाने आंदोलनस्थळी येऊन आंदोलनाला पाठींबा दिला शिष्टमंडळामध्ये संघटनेचे अध्यक्ष सुरेश गुडधे, ग्रामीण अध्यक्ष जानराव केदार पाटील, वामनरावजी शहाणे, मनोहरजी ढवळे तर कुणबी सेनेचे अध्यक्ष सुरेश वर्षे, खैरे कुणबी विदर्भ अध्यक्ष गुणेश्वर आरीकर, श्रीराम हटवार उपतालुकाप्रमुख कामठी यांनी शिवसेना कामठी तालुका तर्फे तसेच कढोली ग्रा.प. तर्फे शेतकऱ्यांना पाणी देण्याचा ठराव घेण्यात आला व कढोली गावातील सरपंचा प्रांजली वाघ यांनी एक शेतकरी आणि सरपंच म्हणून त्यांनी मनपा प्रशासनाकडे विनंती केली व पाठींबा जाहीर केला. जिल्हा कॉंग्रेस कमेटी उपाध्यक्ष रमेशजी जोध यांनी जिल्हा कॉंग्रेस कमेटी तर्फे उपोषणाला पाठींबा जाहीर केला. तसेच जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे अध्यक्ष श्रीरामजी आष्टनकर यांनी देखील आंदोलनाला पाठींबा जाहीर केला

सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्त खंजेरीवादक प्रबोधनकार आनंदपाल महाराज यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. प्राण गेला तरी बेहत्तर शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी जाऊ देणार नाही हा ठाम निर्धार प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी जाहीर केला.

प्रदेश कॉंग्रेस कमेटी महासचिव संदेश सिंघलकर , विदर्भ पर्यावरण कृषी समितीचे समन्वयक सुधीर पालीवाल, नागपूर क्लायमेट क्राईसेस रुपेश वैरागडे, अनिल गोठी आणि माजी नगरसेविका रेखाताई बारहाते यांनी देखील आंदोलनाला पाठींबा जाहीर केला. तसेच थर्मल पावर प्लांट हे एकंदरीत शहरामध्ये प्रदूषण निर्माण करून नागपुरातील पाणी व खनिज निर्माण करून नागपूरकरांना रोगराई च्या गर्तेत ढकलण्याचा हा प्रयत्न आहे तेव्हा अतिरिक्त विजनिर्मिती बंद झाली पाहिजे. असे मत व्यक्त केले आहे.

आज शेतकऱ्यामार्फत कामठी तहसील येथे अनुरागजी भोयर, आशिष मल्लेवार, विजय खोडके, अतुल बाळबुधे, अमोल महल्ले, निरांजन खोडके, रुख्मांगण वाघ, ललित वैरागडे, श्रीकांत मानमोडे, गुड्डू इंगोले, गणेश लांबट, फैजल नागनी, प्यारेलाल जिभकाटे मनोज कुथे व मिथिल गेडेकार. तसेच कुही तहसील येथे रमेश टिचकुले, सुरज झ्न्झाळ, सुधीर वैद्य, आत्माराम टिचकुले, आलोक धाटे, दिलीप म्हैसमारे, विकास काकडे, दिनेश ठाकरे, संजय पिसाळ, शुभम टिचकुले, अविनाश निर्मळकर यांच्या मार्फत दोन्ही तहसीलच्या तहसीलदार साहेबांना निवेदन सादर करण्यात आले.

तसेच आज शिक्षकदिन असल्यामुळे प्रिआंती इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थळी येऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांना दिल्या.

संदीप कांबळे कामठी