Published On : Mon, Sep 4th, 2017

शेतकरी कर्जमाफीपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे

 

· कृषी कर्जमाफी योजनेच्या आढावा
· तलाठी ते तहसिलदार जबाबदारी निश्चित करणार
· प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या बैठका घ्या
· बँकनिहाय पात्र शेतकऱ्यांच्या याद्यानुसार कार्यवाही
· 79 हजार कर्जमाफीसाठी ऑनलाईन नोंदणी

नागपूर: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या महत्वकांक्षी कर्जमाफी योजनेपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतानाच तहसिलदार, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक व तलाठी यांनी प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या बैठकी घेवून ऑनलाईन कर्जमाफीचे अर्ज दिनांक 15 सप्टेंबर पूर्वी भरुन घ्यावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचतभवन सभागृहात शेतकरी कृषी कर्जमाफी योजनेचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.

शेतकऱ्यांना कृषी कर्जमाफीच्या महत्वकांक्षी निर्णयानुसार जिल्हयातील प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. याबाबत प्रत्येक गावात जावून लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्यानुसार मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तहसिलदार यांनी संयुक्तपणे बैठक घेवून योजनेनुसार ऑनलाईन अर्ज भरुन घेणे आवश्यक असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असून प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी पारपाडावी, असे निर्देश यावेळी त्यांनी दिलेत.

कर्जमाफीसंदर्भात राष्ट्रीयकृत बँकांनी तात्काळ लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित तहसिलदाराकडे उपलब्ध करुन द्यावयात. तसेच तहसिलदारांनी बँकेच्या याद्यानुसार गावनिहाय नियोजन करुन प्रत्येक गावात ऑनलाईन अर्ज भरुन घ्यावे, अशी सूचना करतांना पालकमंत्री म्हणाले की, या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी घ्यावी. ग्रामीण भागात शेतकरी कर्जमाफी संदर्भात अद्यापपर्यंत ज्या शेतकऱ्यांना योजनेची माहिती नाही अशा सर्व शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे अर्ज भरुन घ्यावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घ्यावा
शासनाच्या शेतकरी कर्जमाफी या महत्वकांक्षी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी जिल्हयातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी प्रत्येक बँकेच्या शाखेत शेतकरी कर्जदारांना माहिती देण्यासाठी तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.

राष्ट्रीयकृत बँकांच्या ग्रामीण भागातील शाखांमधून शेतकऱ्यांना योजनांची माहिती मिळावी. तसेच ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बॉयोमेट्रीक यंत्रणा बसविण्यासाठी शाखा व्यवस्थापकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेण्याची सूचना करताना बँकेच्या शाखेत बॉयोमेट्रीक यंत्र बसविण्यासाठी प्रशासनातर्फे संपूर्ण सहकार्य देण्यात येईल. बँकेच्या शाखेमध्ये कर्ज घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांशी संपर्क करुन या योजनेचा लाभ द्यावा, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकेबद्दल नाराजी व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व बँकांना सूचना देवून आज सायंकाळपर्यंत तहसिलदारांकडे बँकनिहाय याद्या प्राप्त होतील या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देशही बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

79 हजार शेतकऱ्यांनी भरले ऑनलाईन अर्ज
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्हयातील मंडळ तसेच ग्रामपंचायत स्तरापर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून 624 बायोमेट्रीक केंद्र कार्यरत आहेत. जिल्हयात मागील तीन दिवसात 67 हजार ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले असून आजपर्यंत 79 हजार कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन भरण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी दिली.

शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार असून त्यानंतरच्या फरकाची रक्कम भरल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 टक्के अथवा 25 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन रक्कम मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्हयात सुमारे 1 लक्ष 60 हजार शेतकऱ्यांकडून कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरुन घ्यावेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कर्जमाफी संदर्भात एकही शेतकरी वंचित राहणार नाही यादृष्टीने प्रत्येक गावाचा ग्रामसभेच्या खुल्या बैठकी घेवून खबरदारी घेण्यात येईल. तसेच प्रत्येक तलाठ्याने दररोज 25 अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक असून तालुकानिहाय दैनंदिन आढावा महसूल उपविभागीय अधिकाऱ्याने घेवून या संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

शेतकऱ्यांसाठी टोलफ्री क्रमांक
कर्जमाफी योजनेचा लाभ घेतांना शेतकरी सभासदांना ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे 7887463290 हा स्वतंत्र टोलफ्री क्रमांक सुरु केला आहे. शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरतांना बॉयोमेट्रीक संदर्भात तसेच इतर कुठलीही अडचण आल्यास टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी कामठी, मौदा, तसेच नागपूर ग्रामीण तालुक्यात शेतकरी कर्जमाफी संदर्भात लाभार्थी शेतकरी, ऑनलाईन भरण्यात आलेले अर्ज, तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्जमाफीसाठी पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्राप्त करुन घेणे तसेच गावनिहाय शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात ऑनलाईन अर्जाची सुविधा याबाबत आढावा घेतला. कृषी कर्जमाफीपासून एकही लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही यादृष्टीने नियोजन करण्याचे सूचना दिल्यात.

यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर, अविनाश कातडे, जिल्हा उपनिबंधक एस.एल. भोसले, लिड बँक मॅनेजर अयुब खान, तसेच सर्व तहसिलदार, बँकेचे व्यवस्थापक, विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.