Published On : Thu, Apr 29th, 2021

शेतकऱ्यांचा भाजीपाला आता थेट ग्राहकांच्या घरापर्यंत

भंडारा येथे शेतकरी ते थेट ग्राहक विक्री केंद्राचे उद्घाटन

भंडारा :- महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भंडारा अंतर्गत मानव विकास कार्यक्रम अंतर्गत भंडारा शहरातील सिव्हील लाईन परिसरातील भंडारा तालुका कृषी कार्यालयाच्या आवारात बांधण्यात आलेल्या शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. मानव विकास कार्यक्रम निधी अंतर्गत सिव्हिल लाईन परिसरात शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्रासाठी आठ ते दहा गाळे बांधण्यात आले असून गणेशपुर शेतकरी उत्पादक कंपनीने कोरोना काळात ग्राहकांना विषमुक्त भाजीपाला धान्य हवे पुरवण्यासाठी हे विक्री केंद्र सुरू केले आहे.

Gold Rate
24 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,400 /-
Gold 22 KT ₹ 1,14,800 /-
Silver/Kg ₹ 1,51,600/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी शांतीलाल गायधने, उपसंचालक बलसाने, भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, भंडारा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, मंडळ अधिकारी विजय हुमणे, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तानाजी गायधने, गणेशपुर शेतकरी उत्पादक कंपनीचे सचिव निलेश गाढवे, अध्यक्ष संजय एकापूरे, सुरगंगा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष अजितकुमार गजभिये, यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत शेतकरी शेतीमाल उत्पादक कंपनीच्या सभासदांचा शेतमाल थेट ग्राहकांना विकल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव तर मिळणारच आहे याशिवाय ग्राहकांनाही ताजा, स्वच्छ, दर्जेदार, विषमुक्त भाजीपाला, फळे, दुग्धजन्य पदार्थ, दूध, पोहे, मुरमुरे, तांदूळ, ब्लॅक राईस, रेड राईस ग्राहकांच्या थेट दारापर्यंत पोहोचवून ग्राहकांचा कोरोना काळातील होणारा त्रास व गर्दी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. शिवाय संचारबंदी काळातभाजीपाला फळांचा कुठेही तुटवडा भासणार नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी सांगितले.

भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग आंतर्गत प्रक्रिया उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी दालने सुरू करण्यासाठी आयुक्त धीरजकुमार यांच्या सूचनांनुसार कोरोना काळात जिल्ह्यातील ग्राहकांना विषमुक्त अन्न धान्य फळे भाजीपाला ग्राहकांच्या दारापर्यंत पोचविण्यासाठी हे विक्री केंद्र भंडारा शहरवासीयांसाठी लाखमोलाचे ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांनी या अभियानांतर्गत शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, विविध शेतकरी गटांसाठी शेतमाल विक्रीला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच ग्राहक आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी समन्वय ठेवून मूल्यवर्धित साखळी विकसित करण्यासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे यांनी फळे, भाजीपाला इतर शेतीमाल उत्पादित झाल्यानंतर शेतमालाची स्वच्छता, प्रतवारी, ग्रेडिंग, पॅकिंग विक्री व्यवस्थापनाचे चांगले कौशल्य शेतकऱ्यांना अवगत असल्याने दर्जेदार शेतमाल ग्राहकांना मिळणार असल्याचे सांगितले. संचालन कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी तानाजी गायधने यांनी केले तर आभार भंडारा मंडळ अधिकारी विजय हुमणे यांनी मानले.

सेंद्रिय भाजीपाल्यासह देशी गाईचे दूधही मिळणार
संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत जिल्हा आत्मा यंत्रणेच्या वतीने उभारण्यात आलेल्या शेतकरी ते ग्राहक विक्री केंद्रातून ग्राहकांना ताजा भाजीपाला, फळे यासोबतच दैनंदिन आहारात लागणारे मिरची पावडर, धने, पावडर, हळद, मुरमुरे, पोहे, मसाला, गीर गायीचे दूध, अर्धा लिटर, एक लिटरचे पाऊच यासोबतच तूप, लिंबू, चिकू, धने यासोबतच सर्व ताजा भाजीपाला ग्राहकांना नाममात्र दहा रुपयाच्या डिलिव्हरी चार्जमध्ये पुरविला जाणार आहे. गो कोरोना गो या अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी तर्फे ग्राहकांनी एक दिवस आधी मागणी केल्यास दुसऱ्या दिवशी ग्राहकाने सांगितलेल्या पत्त्यावर थेट भाजीपाला पोहोचविला जाणार असल्याची माहिती शेतकरी कंपनीच्या पदाधिकारी यांनी दिली.

Advertisement
Advertisement