Published On : Sat, Aug 1st, 2020

शेतकऱ्यांनी शेतीसोबत पशुपालनाकडे वळावे – पशुसंवर्धन मंत्री

नागपूर : पशुपालन ही काळाची गरज असून, तो ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय, कुकुटपालनासह पशुपालनाकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात पशुसंवर्धन विभागाच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचे राज्यस्तरीय उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

Advertisement

जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, अर्थ व शिक्षण सभापती भारती पाटील, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सव्वालाखे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, पशुसंवर्धन सहआयुक्त किशोर कुमरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद ठाकरे, यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

भविष्यात कृषी व कृषीपूरक व्यवसायाला मोठी संधी असून, देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहे. सद्यस्थितीत कोविडच्या संकटामुळे मर्यादा आल्या असल्या तरीही हा व्यवसाय पुन्हा जोमाने कात टाकून अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी मिळवून देणार आहे. नागपूर येथून बकरी निर्यातीला सुरुवात झाली असून, त्याची पहिली खेपही निर्यात करण्यात आली आहे. त्यामुळे बकरी पालन व्यवसायाकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन करत यापुढे नागपूर विमानतळावरुन दर महिन्याला बकरी निर्यात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

युवा शेतकऱ्यांनी बकरी व्यवसायासोबतच कुकुटपालन, विविध देशी गायी व म्हशींच्या पालनाकडेही लक्ष द्यावे तसेच महाराष्ट्राला अंडींची मोठी मागणी असून, ती शेजारील राज्यांमधून पूर्ण करावी लागत असल्याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. पशु पालन करताना त्यांना आरोली गावाप्रमाणे हिरवा चारा स्वत: पिकविल्यास त्यावर होणारा खर्चही वाचविता येतो, असे सांगितले. जिल्हा परिषदेच्या विविध‍ ठिकाणी असलेल्या जागेवर हिरवा चारा लावून तो शेतक-यांना मोफत उपलब्ध करुन दिला तर येणारा खर्च जिल्हा नियोजन समितीमधून काढण्याबाबत विचार करता येईल, असे पशुसंवर्धनमंत्र्यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यात कृत्रिम रेतन वाढवून त्यापासून शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ करता येईल. केवळ शेतीत पिकणाऱ्या उत्पादनावर अवलंबून राहण्याचे दिवस संपले असून, शेतकऱ्यांना कृषीपूरक व्यवसायाकडे वळावे लागणार आहे. तसेच कृषी उत्पादनावर आधारीत प्रकिया उद्योगांकडेही अधिक लक्ष द्यावे लागणार असल्याचे ते म्हणाले.

पशुसंवर्धन मंत्र्यांनी नागपूर जिल्ह्याने कृत्रिम रेतनाच्या टॅगींगसंदर्भात राज्याला नवी योजना दिल्याचे सांगून, कृत्रिम रेतन केलेल्या जनावरांचे टॅगींग करण्याबाबतच्या डॉ. राजेंद्र निखाते यांच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. ग्रामपातळीवर पशुसंवर्धन विभागाला येणा-या अडचणी लवकरात लवकर सोडविण्याला प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले.

डॉ. राजेंद्र निखाते यांनी सादरीकरणाद्वारे कृत्रिम रेतनाची माहिती दिली. त्यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला 50 हजार याप्रमाणे साडेसोळा लाख कृत्रिम रेतनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे लक्ष देण्यात आले असून, ते काम युद्धपातळीवर सुरु आहे. कृत्रिम रेतनाला चालना देऊन दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यात येणार असल्याचे श्री. निखाते यांनी सादरीकरणादरम्यान सांगितले.

कोहळी येथील अमोल चैतन्य पुरी व योगेश वामनराव भोकसे या दोन युवकांनी दूध व्यवसायात वृद्धी केली. त्याबद्दल पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अरविंद ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रियंवदा सिरास यांनी केले तर आभार राजेंद्र देवतकर यांनी मानले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement