नागपूर: ‘बांबू लागवड व त्यावरील आधारित उदयोगामूळे चीनमध्ये 50 लक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे. बांबू हे गवतवर्गीय पीक असून त्याची लागवड पडीक जमीनीतही होऊ शकते, यासाठी शेतक-यांनी बाबूंची लागवड शेताच्या धु-यावर केल्यास वर्षानुवर्षे त्यापासून उत्पादन घेऊन फायदेशीर शेती करता येते. बांबूवरील ‘ट्राझींट पास ‘ (टी.पी.)-काढण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून यामूळे बाबूंची लागवड व वाहतूक करणे सुलभ झाले आहे. बाबूंला भाव न मिळाल्यास त्याला ऊसाप्रमाणे भाव देण्याची तयारी शासनाची असून अमरावती, चंद्रपूर, वर्धा या जिल्हयातील शेतक-यांनी बांबू लाग़वड करून आपला आर्थिक विकास साधावा’ , असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे ‘अॅग्रोव्हिजन – 2017’ कृषीप्रदर्शनीच्या समारोपाप्रसंगी केले. या समारंभाच्या अध्यपदावरून ते बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, मध्यप्रदेशचे कृषी मंत्री, गौरीशंकर बिसेन, हरियाणाचे कृषी मंत्री, ओमप्रकाश धनकर प्रामुख्याने उपस्थित होते.
केंद्र शासनाने झूडपी जंगले व चराईच्या जागा यांना वन-जमीनी ऐवजी ‘राजस्व जमीनी’ म्हणून मान्यता दिल्यामूळे लाखो हेक्टर जागा उपलबध झाली आहे. या जागेवर बांबू लागवड केल्यास पर्यावरणाचे रक्षण होऊन लाखो लोकांना रोजगार निर्माण होईल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. गंगानदीच्या काठावरही 10 कोटी वृक्षरोपण करण्यासाठी महाराट्राचे वन मंत्री सुधीर मुनग़ंट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीला जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे गडकरी यांनी सांगितले.
विदर्भात श्वेतक्रांती घडून आणण्यासाठी स्वस्त व प्रोटीनयुक्त पशुखादय दुग्ध-उत्पादकांना उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी रेशीम शेतीतील तुतीच्या काडया, राईस हस्क अशा कृषी मालावर प्रक्रीया करून पशुखादय निर्मिती करण्यासाठी आपण एन.डी.डी.बी. ला सूचना दिल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील सिंदी येथे होणा-या ड्रायपोर्ट मधील प्री-कूलिंग व कोल्ड स्टोरेजच्या सुविधेमूळे विदर्भातील संत्रे व इतर कृषी उत्पादने जागतिक बाजारपेठेत शिरण्याचा मार्ग खुला होणार आहे. यासाठी शेतक-यांनी पीक पद्धतीत बदल व पीकांचे वैविध्यीकरण करणे आवश्यक आहे, असे गडकरी यांनी नमुद केले.
केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी अॅग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतक-यांना नवे तंत्रज्ञान समजून घेता आले असून त्यांचे योग्य मार्गदर्शन झाले आहे, असे याप्रसंगी सांगितले. केंद्र व राज्य शासनाची धोरणे व कार्यक्रम शेतकरी कल्याण केंद्रीत आहेत असे सांगून चंद्रपूरमध्ये युरियाचा प्रकल्प स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जमीन उपलब्ध करून दिली असून लवकरच त्याचे भूमिपूजन होईल, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
मध्यप्रदेशचे कृषी मंत्री, गौरीशंकर बिसेन यांनी मध्यप्रदेशच्या ‘मुख्यमंत्री भावांवर भुगतान योजने’ संदसर्भात उपस्थितांना माहिती दिली. खरीपातील 8 पीकांचा समावेश असलेल्या या योजनेत बाजार मुल्य व समर्थन मूल्याच्या तफावतीतील रक्कम ही थेट शेतक-यांच्या खात्यात जमा होते. हरियाणाचे कृषी मंत्री ओमप्रकाश धनकर यांनी 36 लक्ष पशूधन असलेले हरयाणा सारखे क्षेत्रफळाने छोटे राज्य दुग्ध उत्पादनामध्ये भारतात तिस-या क्रमांकावर असल्याचा बाबीचा यावेळी आवर्जृन उल्लेख केला.
या वर्षीच्या अॅग्रोव्हिजनमध्ये कृषीप्रदर्शनीला सुमारे 5 लाख शेतक-यांनी भेट दिली व 30 हजारापेक्षा जास्त शेतक-यांनी कार्यशाळांत सहभाग घेतला असल्याची माहिती अॅग्रोव्हिजन आयोजन समितीचे सचिव, रवि बोरटकर यांनी आपल्या प्रस्ताविकातून दिली.
या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी अहीर यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री व अॅग्रोव्हिजनचे गडकरी यांचा शाल, श्रीफळ, टोपी व नांगराची प्रतिकृती देऊन विशेष सत्कारही करण्यात आला. वर्धा येथील कुक्कुटपालन केंद्र व महाऑंरेजचे संस्थापक श्रीधर ठाकरे यांचा महाराष्ट्र शासनाचा ‘सरकारमहर्षी’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कृषी प्रदर्शनात सहभागी संस्था, स्टॉल्सधारक, प्रायोजक यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास राज्यसभा खासदार अजय संचेती, वर्ध्याचे खासदार रामदास तडस, स्थानिक लोकप्रतिनिधी व देशाच्या विविध भागातून आलेले शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
