Published On : Fri, Oct 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांचा एल्गार; पोलिसांशी धक्काबुक्की, आमदार नितीन देशमुखांसह आंदोलक ताब्यात

Advertisement

समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांचा एल्गार; पोलिसांशी धक्काबुक्की, आमदार नितीन देशमुखांसह आंदोलक ताब्यात

अकोला : अतिवृष्टी आणि पीक नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाने समृद्धी महामार्गावर आंदोलन छेडले. आमदार तथा उपनेते नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी वाशीम जिल्ह्यातील वनोजा येथे हजारो शेतकरी आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले. आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही आंदोलकांनी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर आमदार नितीन देशमुख यांच्यासह अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेक्टरी एक लाखांच्या मदतीची मागणी-
शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची तात्पुरती मदत देण्याऐवजी अतिवृष्टी आणि पीक नुकसानीची योग्य भरपाई मिळावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून उभारण्यात आलेला समृद्धी महामार्गच आता शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रोखला जात असल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले.

वनोजा येथे हजारोंचा जनसमुदाय-
आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळावा यासाठी आमदार देशमुख आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोला व वाशीम जिल्ह्यांमध्ये दौरे करून शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून वनोजा येथे शेतकरी आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी जमू लागली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. विभागातील विविध जिल्ह्यांमधून दीड हजारांहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनस्थळी दाखल झाले होते.

महामार्ग रोखताच पोलिसांशी संघर्ष-
मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या कारवाईनंतर आंदोलकांनी शासनाविरोधात संताप व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांनी आमदार नितीन देशमुख यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Advertisement

वाहतुकीचा खोळंबा आणि सुरक्षेचा प्रश्न-
समृद्धी महामार्ग हा राज्यातील महत्त्वाचा द्रुतगती मार्ग असल्याने येथे रास्ता रोको केल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवू शकतो. याच कारणास्तव पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तसेच आयोजकांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, पोलिसांच्या मनाईनंतरही ठाकरे गटाने आंदोलनावर ठाम राहत महामार्गावर आंदोलन केले. त्यामुळे वनोजा परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.