
औरंगाबाद : राज्यातील अतिवृष्टीनंतर हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यापूर्वी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावेच लागेल, नाहीतर मी स्वतः गावोगावी जाऊन खरी परिस्थिती जनतेसमोर मांडीन.”
उद्धव ठाकरे म्हणाले, “सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजचा खराखुरा लाभ शेतकऱ्यांपर्यंत किती पोहोचला आहे, हे मी पाहणार आहे. कागदोपत्री आकडे न दाखवता सरकारने आता कृती दाखवावी. ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या, त्या शेतकऱ्यांना माती द्यावी आणि खरी कर्जमाफी करावी, कारण हेच शेतकऱ्यांचे न्याय्य मागणे आहे.”
ते पुढे म्हणाले, “शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे, आणि सरकार म्हणते जूनमध्ये कर्जमाफी होईल. पण तोपर्यंत कर्जाच्या हप्त्यांचे काय? सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे.”
मुख्यमंत्र्यांच्या विधानावर टीका करताना ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणतात, कर्जमाफी केली तर बँकांना फायदा होईल, म्हणून ती केली जात नाही. मग जूनमध्ये केली तर बँकांना नुकसान होईल का? हे कोणते अर्थशास्त्र आहे?”
त्यांनी पुढे सांगितले, “मी मुख्यमंत्री असताना कोणत्याही मागणीशिवाय आम्ही कर्जमाफी केली होती. त्या वेळी तयार केलेली सिस्टीम आजही कायम आहे. डेटा, यंत्रणा सर्व सरकारकडे आहे. मग दुसरा टप्पा जाहीर करण्यात अडथळा काय?”
मराठवाड्याच्या दौऱ्यात ठाकरे शेतकऱ्यांच्या हाती नेमकी किती मदत पोहोचली, हे प्रत्यक्ष पाहणार आहेत.
“आज शेतकरी मला सांगतो. ‘साहेब, तुम्ही कर्जमाफी केली, पण हे सरकार केवळ आश्वासन देते.’ त्यामुळे आम्ही आता मैदानात उतरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा उभारू, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
			


    
    




			
			