
नागपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्यावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्रिगर-१ मध्ये समावेश न झालेल्या राज्यातील सुमारे १५ ते १८ तहसीलांचाही अचूक पंचनामा आणि आनेवारीच्या आधारे दुष्काळाच्या कक्षेत समावेश करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ सदस्यीय उपसमितीला आवश्यक ते अधिकार दिले असून, २५ ऑक्टोबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे नियोजन असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
दुष्काळग्रस्त भागात पाणीटंचाई निर्माण झाल्यास टँकर, चारा छावण्या आणि इतर आवश्यक उपाययोजना केल्या जातील. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मोठ्या औद्योगिक संस्थांशी समन्वय साधून सीएसआरच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बेला येथे ‘स्मार्ट व्हिलेज’ची संकल्पना-
नागपूर जिल्ह्यातील बेला-उमरेड परिसरात घरापासून वंचित असलेल्या गरीब व गरजू नागरिकांसाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बेला येथे ‘स्मार्ट व्हिलेज’ उभारण्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असून पारधी तसेच भटक्या-विमुक्त समाजालाही याचा लाभ मिळणार आहे.
काँग्रेसवर बावनकुळेंची टीका-
जनतेच्या विकासकामांच्या माध्यमातून जनाधार निर्माण करण्याऐवजी काँग्रेस नकारात्मक राजकारणावर भर देत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. जनतेला विकास आणि प्रत्यक्ष काम हवे आहे, आंदोलनाचे राजकारण नव्हे, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीच्या बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीवरही त्यांनी टीका केली. दरम्यान, रोहित पवार यांच्या ‘मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही’ या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, “रोहित पवार यांनी माझ्या घरी यावे. मी दिवाळी साजरी करणार नाही, त्यांचे स्वागत आहे,” असे बावनकुळे म्हणाले.
दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता विवाह समारंभ साधेपणाने करण्याचे आवाहन करण्यात आले असून, आमदारांनीही वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केल्याचे त्यांनी सांगितले. “राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे आहे,” असे आवाहन त्यांनी रोहित पवार यांना केले.



