
नागपूर : राज्यभरातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी या प्रश्नावर सरकारविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. “आता लढा रस्त्यावरच होईल, शेतकऱ्यांचा आवाज दडपता येणार नाही,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.
या पार्श्वभूमीवर ‘महा एल्गार ट्रॅक्टर मोर्चा’ नागपूरात काढण्यात आला, ज्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. रस्त्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड उत्साह आणि घोषणांचा नारा घुमत होता.
मोर्चात ‘शेतकरी हक्क आमचा जन्मसिद्ध’, ‘कर्जमाफी मिळेपर्यंत विश्रांती नाही’ अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला.
बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले, आमचं संयम संपत आलं आहे. शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळा, अन्यथा आम्ही राज्यव्यापी आंदोलन उभारू.
या मोर्चामुळे नागपूर शहरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला.या आंदोलनानंतर राज्यातील शेतकरी संघटनांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून येत असून, आगामी काळात आणखी तीव्र लढा उभा राहण्याची चिन्हे आहेत.








