
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सुरू असलेल्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या पहिल्या लाभार्थी यादीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. येत्या २२ जुलै रोजी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, निश्चित वेळेत पहिली यादी प्रसिद्ध करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. याआधी ३० जुलैपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र लाभार्थी यादी जाहीर न झाल्याने सरकारच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात होते.
केंद्र सरकारकडून आवश्यक माहिती प्राप्त-
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीला झालेल्या विलंबाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे प्रक्रिया लांबल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीसाठी आवश्यक असलेला शेतकऱ्यांचा अंतिम डेटा केंद्र सरकारकडून मिळणे गरजेचे होते. आता केंद्राकडून आवश्यक माहिती प्राप्त झाली असून, पुढील प्रक्रिया वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२२ जुलै रोजी प्राथमिक पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे.
३० जुलैपर्यंत पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट-
कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले की, ३० जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तसेच शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता सरकारकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण केली जाईल, असेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.




