नागपूर: आपल्या इतिहासात अनेक अनाम नायक आहेत. परंतु आपण मात्र फक्त “३००”, “ग्लॅडिएटर” सारखे हॉलीवूडपट पाहण्यात धन्यता मानतो. याच चित्रपटांच्या प्रेरणेतून आणि आपला गौरवशाली इतिहास महाराष्ट्राला पुन्हा जगता यावा या प्रयत्नातून “फर्जंद” या चित्रपटाचा जन्म झाल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केले. यामध्ये छत्रपती शिवबांचा शूर मावळा कोंडाजी फर्जंद यांची वीरगाथा रुपेरी पडद्यावर साकारण्यात आली आहे. यानंतर सुद्धा अश्याच धर्तीवर ३ ते ४ चित्रपट आम्ही आपल्यासमोर आणणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
‘फर्जंद” या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि प्रसाद ओक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी गुरुवारी हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंट येथे पत्रकारांशी संवाद साधला. हा चित्रपट येत्या १ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
भारतीय चित्रपट सृष्टीतील “फर्जंद” हा पहिलाच संपूर्ण ऐतिहासिक युद्धपट आहे. तसेच यानिमित्ताने छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील एक सोनेरी पान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर जिवंत होणार असून प्रेक्षकांनी ते जरूर अनुभवावे, असे आवाहन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी त्यांनी केले. तर अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक आणि अभिनेत्री मृण्मयी यांनी सुद्धा आपल्या भूमिकेवर प्रकाश टाकत प्रेक्षकांना चित्रपट बघण्याचे आवाहन केले.
इसवी सन १६७३ मध्ये शिवरायांच्या ६० मावळ्यांनी कोंडाजी फर्जंद यांच्या नेतृत्वात आदिलशहाच्या २५०० सैनिकांना धूळ चारून अवघ्या साडेतीन तासात पन्हाळा किल्ला सर केला. या मोहिमेत बहिर्जी नाईक, पंत, गणोजी, गुंडोजी, मर्त्या, मोत्याजी मामा यांचेही खंड परिश्रम होते. हीच रोमांचक गाथा फर्जंद चित्रपटात मांडण्यात आली आहे.
चित्रपटात कोंडाजी फर्जंद यांची भूमिका अंकित मोहन याने साकारली असून छत्रपती शिवरायांची भूमिका चिन्मय मांडलेकर तर माता जिजाऊ यांची भूमिका मृणाल कुलकर्णी यांनी साकारली आहे. तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने बहिर्जी नाईक यांची मदतनीस केसरची भूमिका साकारली आहे. तिची एक लावणी देखील चित्रपटात आहे. बहिर्जी नाईक याची भूमिका अभिनेता प्रसाद ओक याने साकारली आहे. तर समीर धर्माधिकारी आदिलशहाचा सरदार बेशक खान याच्या भूमिकेत आहेत. याव्यतिरिक्त अभिनेते गणेश यादव, राजन भिसे, निखिल राऊत, नेहा जोशी, प्रवीण तरडे, सचिन देशपांडे यांच्या देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.
चित्रपटाची गाणी दिग्पाल लांजेकर आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली असून अमितराज आणि केदार दिवेकर यांनी संगीतबद्ध केली आहेत. कला दिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांचे असून बऱ्याच दृश्यांचे चित्रीकरण हे एन. डी. स्टुडिओ कर्जत येथे झाले आहे.
पत्रपरिषदेनंतर सर्व कलाकारांनी सौजन्याचा परिचय देत उपस्थितांसोबत आवडीने सेल्फी आणि छायाचित्रांसाठी पोझ दिली.
—Swapnil Bhogekar