
नागपूर : भाजपमधील नाराजीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. अनिल सोले यांची नाराजी पक्षावर नसून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर होती. त्यांच्या तक्रारींची दखल घेऊन कार्यपद्धतीत बदल करण्याचे ठरवले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
अनिल सोले हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून, नागपुरात पक्षाच्या जडणघडणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेताना जास्तीत जास्त नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा व्हावी, अशी त्यांची अपेक्षा होती. निर्णय कसा घेतला जातो, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या सूचनांची दखल घेत पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आवश्यक बदल केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे सध्या कोणतीही जबाबदारी नसल्याचा मुद्दाही सोले यांनी उपस्थित केला होता. अशा कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटना मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले.
अनिल सोले यांनी आज भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यापूर्वी कधीही पक्षविरोधी भूमिका घेतली नाही. नाराजी असली तरी ते पक्षासोबतच राहतील, असा आम्हाला विश्वास होता, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गिरीश व्यास यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनीही राजीनामा मागे घेतला आहे. या घडामोडींमुळे आनंद व्यक्त करताना, मागील निवडणुकीतील पराभवाची सल यंदा भरून काढण्याचा प्रयत्न करू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.



