नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे नाव जाहीर करण्यात आले. यापार्श्वभूमीवर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नुकतेच गडकरी यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत गडकरी यांचे नाव नसल्याने भाजपवर टीका झाली होती. त्यावेळी फडणवीस यांनीच विरोधकांना प्रत्युत्तर दिले होते. दुसऱ्या यादीत गडकरी यांचे नाव प्रथम क्रमांकावर असेल, असे नागपूरमध्ये सांगितले होते. बुधवारी भाजपची दुसरी यादी आली. त्यात गडकरी यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी एका कार्यक्रमासाठी नागपूरला आले होते. त्यावेळी त्यांनी गडकरी यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान गडकरी हे सलग तिसऱ्यांदा नागपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. यापूर्वीच्या दोन निवडणुका त्यांनी दोन लाखांहून अधिक मताधिक्याने जिंकल्या आहेत. त्यामुळे गडकरी यंदाही हॅट्रिक करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.