नागपूर : भाजपने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली.मात्र यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नाही. यावरून शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल करत गडकरींना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या ऑफरवर खास आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले.
ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींसारख्या नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने मी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती करतो हे सांगण्यासारखं आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
नितीन गडकरी हे महाराष्ट्रातल्या नागपूरमधून लढतात, ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.
पहिली यादी आली.त्यात महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याचे नाव नव्हतं. महाराष्ट्राचा निर्णय झाला नव्हता, त्यामुळे आम्ही ती चर्चा केली नाही. महायुतीचा निर्णय होऊन महाराष्ट्रातल्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळी सर्वात आधी नितीन गडकरींचे नाव येईल. त्यामुळे मला वाटतं स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.