मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात कोणतीही राजकीय समीकरणे तयार होऊ शकतात, असे सूचक विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. काल देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर होते. भविष्यात काय होईल, हे सांगता येत नाही, असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला नवा विषय दिला.
भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत झालेल्या संवादाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, शेलार यांना लवकर निघायचे असल्याने आम्ही बाजूला बसून प्रेमाने संवाद साधला. भाजपमध्ये मांडीला मांडी लावून बसावे, असे वाटणारे फार कमी लोक आहेत आणि त्यामध्ये आशिष शेलार यांचा समावेश आहे. आम्ही सुडाचे राजकारण करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय पक्षांतरावर भाष्य करताना प्रत्येक नेता स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांच्याशी आपले वैयक्तिक भांडण नसून राजकीय संघर्ष मात्र कायम राहील, असेही राऊत म्हणाले. शिवसेनेमुळेच आज आपण या स्थानावर असल्याचे मान्य करत त्यांनी पक्षातील काही गोष्टी मनासारख्या झाल्या, तर काही झाल्या नसल्याचेही सांगितले.
महाभारताचा संदर्भ देताना राऊत यांनी ‘सूड’ या शब्दाचा उल्लेख केला. महाभारतातील प्रत्येक पात्र आजच्या राजकारणातही दिसते आणि महाभारताचा प्रवास कधीच संपत नाही, असे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अनेक वर्षे काम केल्यामुळे त्यांच्याबद्दल पुस्तक लिहावे, असा अनेकांचा आग्रह असला तरी काही गोष्टी मनातच ठेवायच्या असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आपल्या पुस्तकाचे प्रकाशन होत असल्याची माहिती देतानाच त्यांनी लेखन आणि लोकशाहीतील अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरही भाष्य केले. एखाद्या पुस्तकातील काही मते पटली नाहीत, तरी लेखकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. यालाच लोकशाही म्हणतात, असे राऊत म्हणाले. हॉलीवूडमधील चांगले लोक आपल्यावर चित्रपट तयार करतील, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.




