– दोन्ही कंपन्यांना दिला अल्टीमेटम : झोननिहाय घेतला आढावा
नागपूर : कचरा संकलनाची नवी व्यवस्था कार्यान्वित होऊन सहा दिवस झाले. मात्र, आजही शहराच्या रस्त्यावर कचरा दिसतो आहे. संक्रमणाच्या काळात वेळ लागतो, हे मान्य असले तरी नागरिकांच्या संयमाचा बांध फुटण्याअगोदर पुढील दोन दिवसांत कचरा संकलनाचे कार्य सुरळीत करा. गाड्यांची संख्या तातडीने वाढवा. यापुढे कुठलेही कारण खपवून घेणार नाही, असा अल्टीमेटमच नवनिर्वाचित महापौर संदीप जोशी यांनी कचरा संकलन करणाऱ्या दोन्ही कंपन्यांना दिला.
महापौर म्हणून निर्वाचित झाल्यानंतर लगेच महापौर संदीप जोशी यांनी कचरा संकलन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलाविली. बैठकीला त्यांच्यासह उपमहापौर मनिषा कोठे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, माजी महापौर प्रवीण दटके, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, पशु चिकित्सक अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले उपस्थित होते.
महापौर संदीप जोशी यांनी या प्रारंभी नव्याने सुरू झालेल्या कचरा संकलन व्यवस्थेची झोननिहाय माहिती झोनल अधिकाऱ्यांकडून घेतली. आजही काही ठिकाणी गाड्या कमी असल्याचे,जेसीबी, टिप्पर येत नसल्याचे झोनल अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. माजी महापौर प्रवीण दटके यांनी सध्या कचरा संकलनामध्ये येत असलेल्या अडचणींबाबत सांगितले. अनेक भागात छोट्या गल्ल्यांमध्ये गाड्या जात नाहीत. लोकांना सकाळी ११ वाजताअगोदर कचरा यंत्रणेकडे देण्याची सवय लागली. परंतु आज दुपारी २ पर्यंतही त्यांच्याकडून कचरा घेतला जात नाही. आरोग्य विभागाचे अधिकारीही नियंत्रण ठेवण्यात कमी पडत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी गांधीबाग आणि इतवारी परिसरातील कचऱ्याचा प्रश्न गांभीर्याने मांडला. नव्या यंत्रणेने अद्याप व्यापारी असोशिएशनची बैठक घेतली नाही. मार्केटमधील कचरा अद्यापही उचलला जात नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली. आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनीही नव्या व्यवस्थेत असलेल्या त्रुट्यांवर प्रकाश टाकला.
आयुक्त अभिजीत बांगर यांनी सध्या कंपन्यांकडून सुरू असलेले कार्य आणि प्रशासनातर्फे करण्यात येत असलेली कार्यवाही याबाबत माहिती दिली. सध्या असलेल्या गाड्यांची परिपूर्तता होत नसल्याने तातडीने नव्या गाड्या देण्यासंदर्भात कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचे त्यांनी महापौरांना सांगितले. कंपन्यांकडून यापुढे कुठलाही हलगर्जीपणा नको, अशी ताकीद त्यांनी उपस्थित कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली.
महापौर संदीप जोशी यांनी झोनल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीची गंभीर दखल देत दोन दिवसांत आवश्यक सर्व त्या साधनांची परिपूर्तता करण्याचे निर्देश प्रशासन आणि कंपन्यांना दिले. २५ तारखेनंतर रस्त्यावर आढळल्यास दंडाची रक्कम दुप्पट करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. झोनल अधिकाऱ्यांनी रात्रं दिवस नव्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवावे. कार्यात कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असेल तर तो खपवून घेण्यात येणार नाही, असा इशारा दिला.
बैठकीला दहाही झोनचे झोनल अधिकारी रामभाऊ तिडके, डी.पी. टेंभरे, दिनेश कलोते, डी.पी. पाटील, विठोबा रामटेके, श्री. आत्राम, सुरेश खरे, रामभाऊ काहीलकर, रोशन जांभुळे, महेश बोकारे व सर्व प्रभागातील आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.