Published On : Sat, Nov 23rd, 2019

बालकामगार प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा- ठाकरे

Advertisement

नागपूर‍: बालकामगार या अनिष्ठ प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या अभियान मध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा. तसेच मुलांना कामावर ठेवू नका. आयुष्यात एकदाच येणारे बालपण मुलांना आनंदाने जगू द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी बाल कामगार जनजागृती रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी केले.

बालकामगार अनिष्ठ प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी शासनामार्फत बाल कामगार प्रथेविरुध्द जनजागृती अभियान येत्या 7 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शम्स गर्ल्स हायस्कूल, मोमीनपुरा येथून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती रॅलीला जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. यावेळी अपर कामगार आयुक्त विजयकांत पानबुडे, सहाय्यक कामगार आयुक्त रा.मो. धुर्वे आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

जनजागृती रॅलीमध्ये सहाय्यक कामगार आयुक्त मा.पे. मडावी, कामगार अधिकारी पवनकुमार चव्हाण, समन्वयक दिनेश ठाकरे, अपर कामगार आयुक्त कार्यालयातील कर्मचारी तसेच शम्स हायस्कूल व निराला हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी विविध घोषणाफलक हातात घेऊन 14 वर्षाखालील लहान मुलांना कुणीही कामावर ठेवू नये, तसेच 14 ते 18 वयोगटातील बालकांना धोकादायक उद्योगात कामावर ठेवू नये, बालकांना शाळेत पाठवा, बालकांचे बालपण कायम ठेवा, असा संदेश दिला. दरम्यान कुणीही कुठेही बालकामगार ठेवू शकणार नाही याबाबत स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. सुमारे चारशे आस्थापना मालकांनी बालकामगार न ठेवण्याचे शपथपत्र यावेळी भरुन दिले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement