Published On : Tue, Dec 12th, 2017

मुक्‍त व्यापार कराराअंतर्गत उपलब्ध निर्यातीच्‍या संधीचा लाभ निर्यातदारांनी घ्‍यावा : ए. बीपीन मेनन


नागपूर: विदेशातील बाजारपेठांमध्‍ये निर्यातीच्‍या संधी भारताने संबंधित देशासोबत केलेल्‍या मुक्‍त व्‍यापार करारामूळे उपलब्‍ध झाल्‍या असून आपल्‍या उत्‍पादनांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करण्‍यासाठी निर्यातदार व उदयोजकांनी निर्यात संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन केंद्रीय वाणिज्‍य व उदयोग मंत्रालयाच्‍या वाणिज्‍य विभागाचे संचालक ए. बीपीन मेनन (भारतीय व्‍यापार सेवा) यांनी नागपूर येथे केले.केंद्रीय वाणिज्‍य व उदयोग मंत्रालयाच्‍या अंतर्गत नागपूर येथील संयुक्‍त संचालक, विदेश व्‍यापार संचालनालय (डी.जी.एफ.टी.) यांच्‍या कार्यालयाच्या वतीने निर्यातदारांसाठी निर्यात बंधू योजनेअंतर्गत ‘मुक्‍त व्‍यापार करार’ (एफ.टी.ए.) या विषयावर आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना मेनन बोलत होते. याप्रसंगी डी.जी.एफ.टी. नागपूरचे सहायक महासंचालक अनुपम कुमार उपस्थित होते.

भारताने आतापर्यंत विविध देशांसोबत मुक्‍त व्‍यापार करार केले असून यात श्रीलंका, दक्षिण कोरीया, आसियान, नेपाळ, भूटान, जपान, सिंगापूर, दक्षिण आशिया, मलेशिया या प्रदेशांचा समावेश होतो. चीनसारख्‍या देशामध्‍ये निर्यातीच्‍या संधी उपलब्‍ध असून तेथील स्‍पर्धात्‍मक वातावरणात भारताने सुद्धा मार्केटिंग करणे आवश्‍यक आहे. यासाठी विदर्भातील औदयोगिक संघटनानी चीन-केंद्रीत निर्यात धोरणासाठी प्रयत्‍न करणे व चीनमधील संभाव्‍य खरेदीदारांसाठी संवाद साधणे गरजेचे आहे, असे मेनन यांनी यावेळी नमूद केले. नागपूरातील संत्री, प्रक्रीया केलेली संत्रा उत्‍पादने, कापूस, सुत, जिनींग प्रेस मशिन्‍स, चिंच,लाल मिर्ची पावडर यांना निर्यातमूल्‍य असून विविध देशांमध्‍ये या वस्‍तूंच्‍या निर्यातीच्‍या संधी, त्‍यावरील कस्‍टम डयुटी (अबकारी शुल्‍क) यासंदर्भात सविस्‍तर माहिती मेनन यांनी सादरीकरणाव्‍दारे उपस्थितांना दिली.

आयात, निर्यात व गुंतवणूक हे एकमेकांवर अवलंबून असून विदेश व्‍यापारांच्‍या माध्‍यमातून गुंतवणूक वाढून देशातील उत्‍पादन क्षेत्र व आयात क्षेत्रालाही त्‍याचा लाभ मिळतो. म्‍हणून मुक्‍त व्‍यापार करार हे निर्यात क्षेत्रापुरतेच मर्यादित नाही, असे मत मेनन यांनी यावेळी मांडले.


विदेश व्‍यापार व निर्यात संदर्भात विदेश व्‍यापार संचालनलयाच्‍या संकेतस्‍थळावर विस्‍तृत माहिती असून ‘कॉन्टॅक्ट डी.जी.एफ.टी सर्विसेस’ या लिंकवर लायसेसिंग व इतर प्रमाणपत्र व योजनेसंदर्भात निर्यातदारांना सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत, अशी माहिती नागपूर येथील विदेश व्‍यापार संचालनालय सहायक महासंचालक अनुप कुमार यांनी दिली. विदेश व्‍यापार धोरणचा मध्‍यावधी आढावा 2015 – 2020 या कालावधीसाठी जाहीर झाला असून यामध्‍ये एम.ई.आय.एस. ( मर्चेडाइंस एक्‍सपोर्ट फार्म इंडिया स्कीम ) या योजना नव्‍याने समाविष्‍ठ करण्‍यात असल्‍या असून यामुळे विशिष्‍ट बाजारपेठांमध्‍ये मालाची निर्यात करण्‍याचा मार्ग खुला झाला आहे , असेही त्‍यांनी सांगितले.


विदेश व्‍यापार संचालनलय , नागपूरचे विदेश व्‍यापार अधिकारी गोपालकृष्‍णन यांनी निर्यात सुरू करण्‍यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र ऑनलाईन प्राप्‍त करण्‍याच्‍या प्रक्रीयेबद्दल उपस्थितांना सांगितले. यासाठी आपल्‍या फर्मच्‍या नावे असलेला धनादेश किंवा बँकेचे व्‍यवहार पत्र , आधार कार्ड व पॅनकार्ड या तीन गोष्‍टींची गरज असून संकेत स्‍थळावरून अपलोड करण्‍याची सुविधाही आहे, असे त्‍यांनी सांगितले.

या कार्यशाळेत विदेश व्‍यापार संचालनलय , नागपूरचे अधिकारी व कर्मचारी, नागपूरातील निर्यातदार तसेच उद्योजक उपस्थित होते.