Published On : Wed, Oct 27th, 2021

३x६६० कोराडी वीज केंद्राच्या मुख्य अभियंता पदावरुन प्रकाश खंडारे यांची हकालपट्टी करा

Advertisement

कोराडी – कोराडी वीज केंद्राच्या राख हाताळणी विभागातील कंत्राटी कामगारांच्या समस्या निवारण प्रकरणी मुख्य अभियंता प्रकाश खंडारे जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करत असल्याचा ठपका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री व राष्ट्रवादी चे नेते प्राजक्त तनपुरे यांचेकडे निवेदनातून केला. गडचिरोलीच्या दौऱ्यावर मंत्री महोदय आले असता त्यांनी महानिर्मिती नागपूर, बिजली नगर येथील विश्रामगृह येथे भेट दिली.

सहा महिने उलटले तरी अद्याप राख हाताळणी विभागातील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांनी हालचाली केल्या नाहीत. कामगारांच्या वेतन विषयक समस्या सोडविण्यासाठी कोराडी वीज प्रशासन निष्क्रिय असून ए.बी.यु. कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला पाठीशी घालणारे आहे.

यांच्या कार्यकाळात कंत्राटी कामगाराची दिवाळी अंधारात जाण्याची दाट शक्यता आहे. कंत्राटी कामगारांना न्याय देण्याविषयी कोणतीही उपाय योजना मुख्य अभियंता कडे नाही. राख हाताळणी विभाग उपमुख्य अभियंता, उपमुख्य अभियंता (प्रशासन), अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता विभाग प्रमुख, उप औद्योगिक संबंध अधिकारी, कल्याण अधिकारी ह्यांची बघ्यांची भूमिका आहे. मुख्य अभियंता कडे नेतृत्व कौशल्य चा अभाव असून निर्णय घेण्याची क्षमता नाही.याचे जिवंत उदाहरण म्हणजे कोळसा हेराफेरी चे प्रकरण आहे. कोळसा हाताळणी विभागातील अनुभवी अधिकाऱ्यांची बदली करणे तसेच अधिकार शून्य अभियंत्यांवर कार्यवाही करून त्यांना बलीचा बकरा बनविण्यात आले.

कोराडी वीज प्रकल्पातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने प्रकल्पात प्रदुषण रोखणारी उपकरणे लावण्याचे निर्देश दिले होते.पण मुख्य अभियंता प्रकाश खंडारे कडे दुरदृष्टकोन नाही. त्यामुळे कोराडी वीजनिर्मिती परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यानुसार आज मुख्य अभियंताची हकालपट्टी करणे कंत्राटी कामगारांच्या हितावह आहे.

ज्याचे राज्य त्याचे शिलेदार जास्त ताकदवर, ही पूर्वापार चालत आलेली परंपरा. पण, या परंपरेचे पाईक कोणी असावे, याचे तारतम्य असणेही गरजेचे असते. या पंक्तीत जर उच्चपदस्थ मुख्य अभियंता असे अधिकारी येऊ लागले तर लोकशाहीच्या तीन स्तभांपैकी एका स्तंभाची प्रतिमा मलिन होऊ लागते. दुर्दैवाने कोराडी वीज केंद्रात हे सातत्याने होत आहे. सत्ता बदलली की काही अधिकारी वरचढ होतात आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना त्रास देण्यास सुरुवात होते. जोवर मुख्य अभियंता सत्ताधारी पक्षाची तळी उचलत राहतील, तोवर हा खेळ असाच सुरू राहील आणि हे स्थानिक रहवाशी, कंत्राटी कामगार, लहान कंत्राटदारांना अत्यंत दुर्दैवी आहे.

राख हाताळणी विभागातील कामगारांच्या समस्या वाढतच आहे. यासंदर्भात वारंवार कोराडी वीज प्रशासनाला निवेदन देऊनही उपाययोजना होत नसल्याने कोराडी वीज केंद्र या सरकारी कार्यालयात मनमानी कारभार करणाऱ्या मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना प्रत्यक्ष भेटून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी निवेदनातून केली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेस कामठी विधानसभा अध्यक्ष उषा रघुनाथ शाहू प्रामुख्याने उपस्थित होते.