Published On : Sat, Jun 16th, 2018

नागपूर पावसाळी अधिवेशनाआधी होणार बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार

नागपूर : येथे पावसाळी अधिवेशन होणार आहे. मात्र, अधिवेशनाच्या आधी बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या संबंधी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संकेत दिले आहेत.

अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. हिवाळी अधिवेशनाआधी होणारा मंत्रिमंडळ विस्तार लांबला होता. अखेर पावसाळी अधिवेशन आधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याने भाजप आणि सेनेमधील आमदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या मंत्रिमंडळात कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल आणि कोणाला काढण्यात येणार, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

गेले दीड वर्षे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केवळ चर्चाच सुरू आहे. अधिवेशनापूर्वी तर या चर्चेला उधाण येते. पुढील महिन्यात पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे अध्यक्ष अमित शाह मुंबई दौऱ्यावर आले होते. तेव्हाही या विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे आता लवकरच हा विस्तार होण्याची शक्यता आहे.