Published On : Thu, May 21st, 2020

कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी केली आयसोलेशन हॉस्पीटलची पाहणी

Advertisement

नागपूर: कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी गुरूवारी (ता.२१) मनपाच्या आयसोलेशन हॉस्पीटलला भेट देउन रुग्णालयाच्या कार्याची पाहणी केली. याप्रसंगी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, धंतोली झोन सभापती लता काडगाये, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ.प्रदीप दासरवार तसेच हॉस्पीटलमधील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

आयसोलेशन हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय सेवा सुरू असून निर्माण कार्य सुद्धा सुरू आहे. रुग्णालयामध्ये ‘अँटी रॅबिज इंजेक्शन’ व औषधांचा पुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा, असे निर्देश यावेळी कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी दिले. सद्याच्या परिस्थितीमध्ये हॉस्पीटलमधील कर्मचारी सुमारे १२-१२ तास सेवा देत आहेत. त्यामुळे रुग्णालयात कर्मचा-यांची संख्याही वाढविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

याशिवाय मनपाच्या बाभुळखेडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रालाही कार्यकारी महापौरांसह सर्व मान्यवरांनी भेट दिली. बाभुळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरक्षा भिंत तुटलेली असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ती तात्काळ दुरूस्त करण्यात यावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले. शहरातील इतर रुग्णालयांच्या सुविधांविषयी यावेळी कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी वैद्यकीय अधिका-यांशी चर्चा केली.

मनपातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सेवा देण्यात येत आहे. येथील सुविधेबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय मनपाच्या आरोग्य केंद्रांमधून शहराबाहेर प्रवास करणा-यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यात येत आहे, त्याचाही आढावा कार्यकारी महापौरांनी घेतला.