नागपूर : नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ अंतर्गत इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांकरिता क्रीडा स्पर्धेला बुधवारी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरुवात झाली. धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून स्लम सॉकर संचालक श्री. विजय बारसे, एचसीएल संचालक श्री. पियुष वानखेडे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू श्री. गुरुदास राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम होत्या.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने ‘शिक्षणोत्सव’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत माध्यमिक विभागातील क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, धंतोली झोनचे सहायक आयुक्त श्री प्रमोद वानखेडे, मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी, सहायक शिक्षण अधिकारी श्री. संजय दिघोरे, आकांक्षा फाउंडेशनचे संचालक श्री. सोमसूर्व चॅटर्जी, शिक्षण विभागाचे मुख्य समन्वयक श्री. विनय बगले, क्रीडा विभागाचे श्री जाधव उपस्थित होते.
सर्वप्रथम यशवंत स्टेडियम येथे हॉकीचे जादूगर स्व.ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. मशाल दौडने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. मनपाचा एकात्मता नगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम सादर केले. नंतर विद्यार्थ्यांनी शाळेच्या नावाचे फलक आणि बोर्ड घेऊन मार्च पास करत सर्वांचे लक्ष वेधले. जयताळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे, योग प्रात्यक्षिके सादर केले. लाला बहादूर शास्त्री शाळेकडून ऍरोबिक्स सादर करण्यात आले. एम.ए.के. आझाद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मार्शल आर्ट्सचे प्रात्यक्षिक दाखवले. आकांक्षा फाउंडेशनद्वारा संचालित मनपा इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी हुलाहुब सादर केले. संजय नगर शाळेकडून वेलकम ड्रिल करण्यात आले. स्वागत गीत एम.ए.के. आझाद शाळेच्या विद्यार्थ्यांनी म्हटले. यानंतर रस्सीखेच स्पर्धेसह क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली.
प्रमुख अतिथी स्लम सॉकरचे संचालक श्री. विजय बारसे यांनी ‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ अंतर्गत क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक केले. शाळेतील क्रीडा महोत्सव उच्च दर्जाचे असतील तर अनेक खेळाडू आपल्याला मिळतील असे ते म्हणाले. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे खेळाचा त्यांनी आनंद घेतला व विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांचे मनोबल वाढवले. तसेच मनपा शाळेतील मुख्याध्यायापक व शिक्षकांनी विद्यार्थांना शालेय ज्ञानासोबत खेळाचे देखील ज्ञान देत आहेत याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला.
मनपा शिक्षण अधिकारी श्रीमती साधना सयाम यांनी क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिक व खेळांचे कौतुक केले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या खेळाडू वृत्तीला प्रोत्सहन मिळत आहे. ‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ अंतर्गत चित्रकला, हस्तकला, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळेल, असेही त्या म्हणाल्या. शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
प्रास्ताविक क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांनी केली. यावेळी त्यांनी मनपा आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनात ‘शिक्षणोत्सव २०२४-२५’ अंतर्गत विद्यार्थ्यांकरिता क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाकरिता पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
२२ जानेवारी २०२५ रोजी शिक्षणोत्सवाचा शुभारंभ झाला. क्रीडा स्पर्धांना ३ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात झाली. ३ आणि ४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाल येथील चिटणीस पार्क येथे इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच ५ ते ७ फेब्रुवारी २०२५ रोजी धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथे इयत्ता सहावी ते आठवी आणि नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
५ फेब्रुवारी रोजी यशवंत स्टेडियम येथे मनपा शिक्षिका ( राष्ट्रीय खेळाडू व्हॉलीबॉल) श्रीमती मिताली पाटील यांनी सर्व उपस्थितांना क्रीडा प्रतिज्ञा दिली. क्रीडा स्पर्धांमध्ये मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी रस्सीखेच, १०० मीटर दौड, गोळा फेक, थाळी फेक, खो-खो अशा विविध खेळांमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला. कबड्डी, व्हॉलिबॉल, लंगडी, क्रिकेट या स्पर्धा ६ फेब्रुवारी रोजी घेण्यात येतील तर फुटबॉल, कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धा ७ फेब्रुवारीला होतील. शिक्षणोत्सव कार्यक्रमाचा समारोप १० फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट्ट सभागृहामध्ये होणार आहे.
याप्रसंगी श्रीमती अनिता भोतमांगे, शाळा निरीक्षक श्रीमती अश्विनी फेद्देवार, श्रीमती सीमा खोब्रागडे, श्री. जयवंत पिस्तुले, श्री विजय वालदे, श्री प्रशांत टेंभुर्णे, एम. ए. के. आझाद शाळेच्या मुख्याध्यापिका समीना कुरेशी, संजय नगर हिंदी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गीता दांडेकर, सांस्कृतिक प्रमुख, संगीत शिक्षक श्री प्रकाश कलसिया, बौद्धिक प्रमुख श्री कृष्णा उजवणे, मनपा शाळेतील सर्व शिक्षक गण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका श्रीमती मधू पराड यांनी केले. आभार नियंत्रण अधिकारी श्री. नितीन भोळे यांनी मानले.