नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने बहुमताने विजय मिळवत राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली. मात्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका व्यक्त केली. काँग्रेसने वाढलेल्या मतदार संख्येवर आक्षेप घेतला आहे.
काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मांडलेल्या भूमिकेनंतर ईव्हीएमवर आक्षेप नाही. वाढलेले मतदार आले कुठून हे स्पष्ट करावे, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले. नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला.
आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली तर भाजपच्या पोटात दुःखते. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्र बदनाम होत आहे. दिवस ढवळ्या डाका टाकण्याचे काम होत आहे, यावर कुणी बोलायला तयार नाही. आम्ही स्वतः या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागणार आहोत. देशाच्या जनतेच्या लक्षात आणून देणार आहोत.
महायुतीतील ६५ टक्के मंत्री भ्रष्टाचारी –
मंत्रीमंडळातील ६५ टक्के मंत्री भ्रष्टाचारी, गुन्हेगारी आणि बलात्काराचे आरोप आहेत. या मंत्रीमंडळाला बरखास्त केले पाहिजे. या सगळ्या मंत्र्यांबद्दल पुरावे सहित माहिती मांडू, असा इशारा पटोले यांनी दिला.