Published On : Tue, Sep 12th, 2017

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयाला 50 हजार रुपयाचा पुरस्कार

नागपूर : ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन चळवळीला प्रोत्साहन देताना सार्वजनिक ग्रंथालयाचा गुणात्मक विकास तसेच प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालयासाठी 50 हजार रुपयाचा रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी 20 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी केले आहे.

ग्रंथालय संचालनालयाकडून सार्वजनिक ग्रंथालयांसाठी शहरी व ग्रामीण विभागातील अ ते ड वर्गवारीतील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 50 हजार रुपये, 30 हजार रुपये, 20 हजार रुपये व 10 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. ही पुरस्कार योजना 2017-18 या वर्षासाठी असून या योजनेत सहभागासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या जिल्हा ग्रंथपालाकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कार्यकर्ता आणि सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येणार असून यासाठी प्रत्येक महसूल विभागासाठी 15 हजार रुपये रोख पारितोषिक व सन्मानपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी विहित नमुन्यात 20 सप्टेंबर पर्यंत तीन प्रती जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावे, असे जिल्हा ग्रंथपाल ग.मा. कुरवाडे यांनी कळविले आहे.