
नागपूर : कलासागर संस्थेच्या २०व्या बहुभाषिक एकांकिका नाट्य महोत्सवात गुरुवारी सादर झालेल्या ‘स्मिता स्मृती’, ‘गोष्टीचा खेळ’ आणि बालनाट्य ‘मुक्तांगण’ या एकांकिकांनी रसिकांची मनं जिंकली. विविध भाषांतील, विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या या नाट्यप्रयोगांनी कलावंतांची सर्जनशीलता आणि सामाजिक जाण यांची झलक दाखवली.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अतिथी विलास गावंडे, बाळासाहेब अंबादेकर आणि रेखा भोंगाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी कलासागरचे मुख्य प्रवर्तक व सचिव पदम नायर, अध्यक्ष रविशंकर गिल्लुरकर, कार्यकारी अध्यक्ष सुशील तिवारी, उपाध्यक्ष रवींद्र बिजवे, कोषाध्यक्ष डॉ. रमेश बारसकर, सहसचिव रुपाली वंजारी व सविता पांडे उपस्थित होते.
महोत्सवात प्रथम ‘गोष्टीचा खेळ’ ही मराठी एकांकिका सादर करण्यात आली. तन्मय गंधे लिखित व दिग्दर्शित या नाटकात आकांक्षा भाके, ऋतुजा कुमरे, रुद्र भद्रे, रौनक पळसापुरे, तेजस्विनी सदावर्ती, आस्वी गाढवे यांनी भूमिका साकारल्या. तांत्रिक विभागाची जबाबदारी स्तवन गवारे आणि कार्तिकेय ठाकरे यांनी सांभाळली.
यानंतर सादर झालेल्या बालनाट्य ‘मुक्तांगण’ या एकांकिकेचे लेखन समर बोबडे तर दिग्दर्शन किशोर येळणे यांनी केले. या नाटकात यिष दास, आराज्ञा गवळी, शामली गडपायले यांनी भूमिका साकारल्या असून तांत्रिक जबाबदारी तेजस नहातकर, ज्योती गवळी, नलिनी कोळे आणि सपन राऊत यांनी पार पाडली.
महोत्सवाचा समारोप रोशन खोब्रागडे लिखित ‘स्मिता स्मृती’ या प्रभावी एकांकिकेने झाला. या नाटकाच्या भावनिक आशयाने प्रेक्षकांना अंतर्मुख केले.
या तिन्ही सादरीकरणांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून कलासागर संस्थेचा हा वार्षिक नाट्यमहोत्सव नागपूरच्या रंगभूमीला नवचैतन्य देणारा ठरला.










