Published On : Sun, Sep 24th, 2017

कोराडीत साकारणार 7 डी थिएटर जगभराच्या पर्यटनाचा अनुभव घेता येणार : पालकमंत्री

koradi mahotshav mahaarti
नागपूर: कोराडी सांस्कृतिक व पर्यटन विकास आराखड्यात आता 7 डी थिएटरचा समावेशही करण्यात आला असून त्यासाठी शासनाने 25 कोटी रुपयांना मान्यता दिली असून हे थिएटर तयार झाल्यानंतर जागतिक पर्यटनाचा अनुभव येथे बसून जनतेला घेता येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

कोराडी सांस्कृतिक व पर्यटन विकास महोत्सवाचे आज शानदार उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रसिध्द गायक आणि संगीतकार जीत गांगुली, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, महापौर नंदा जिचकार, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, पर्यटन विभागाचे हनुमंत हेडे, माजी मंत्री अ‍ॅड. सुलेखाताई कुंभारे, सौ. ज्योती बावनकुळे, सरपंच अर्चना मैंद, भाजप नेते रमेश मानकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची या संस्थानला भरघोस मदत असल्याचा आवर्जून उल्लेख करीत पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, 186 कोटींचे अनुदान शासनाने मंजूर केले असून टप्प्याटप्प्याने हा निधी मिळत आहे. या महोत्सवामुळे संपूर्ण नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील वातावरण धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक होत आहे. संपूर्ण राज्यात या संस्थानची ख्याती पोचावी यासाठी आपले प्रयत्न आहेत. पर्यटन महामंडळ, नासुप्र, महानिर्मिती, महाऊर्जा, एनटीपीसी, कोराडी जगदंबा संस्था अशा सुमारे 10 शासकीय संस्थांच्या मदतीने हा कार्यक्रम होत असल्याचा उल्लेखही बावनकुळे यांनी यावेळी केला.

श्री जगदंबेच्या महाआरतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर पूजा हिरवडे आणि श्रध्दा हिरवडे या दोन्ही बहिणींनी सुंदर भरतनाट्यम या प्रसंगी सादर केले.

जीत गांगुलींमुळे भरला उत्साह
प्रख्यात गायक आणि संगीतकार जीत गांगुली यांच्या गाण्यांनी या महोत्सवात आज उत्साह भरला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी आणि नागरिकांनी गर्दी केली होती. कोराडी देवीवर तयार केलेली भक्तिगीते जीत गांगुली यांनी सादर केली. सुरुवातीच्या 4-5 भक्तिगीतांनंतर गांगुली यांनी तरुणाईला हवीहवीशी वाटणारी आधुनिक संगीताच्या आधारावरील चित्रपटांची गीते सादर केली. त्यांच्या दमदार आवाजाने हा परिसर दणाणून गेला होता. गांगुली यांच्या सहकारी शुभश्री देवनाथ यांची त्यांना युगलगीतांमध्ये चांगली साथ मिळाली. शुभश्रीच्या आवाजाने युगलगीतांचा आनंद हजारो श्रोत्यांनी घेतला.

आज सुधा चंद्रन यांचे नृत्य
प्रसिध्द नृत्यांगना व चित्रपट अभिनेत्री सुधा चंद्रन या उद्या दिनांक 25 रोजी सायंकाळी 7 वाजता आपला नृत्याविष्कार सादर करणार आहेत. उद्याच्या कार्यक्रमाचे त्या आकर्षण असतील. त्यांच्या सोबत निरंजन बोबडे भावसंध्या हा कार्यक्रम सादर करतील. तत्पूर्वी सायंकाळी 6.30 वाजता होणार्‍या महाआरतीला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रामुख्याने उपस्थित राहतील.