Published On : Mon, Apr 9th, 2018

एम्प्रेस मॉलमध्ये गदारोळ : माजी महापौर दटके, काँग्रेस नगरसेवक बंटी शेळकेंवर गुन्हे दाखल

Advertisement

नागपूर: एम्प्रेस मॉल परिसरात गोंधळ निर्माण केल्याबद्दल माजी महापौर प्रवीण दटके, काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके, रमेश पुणेकर आणि इतरांवर गणेशपेठ पोलिसांनी दाखल केले आहेत. शनिवारी एम्रेस मॉल परिसरातील विहीर साफ करण्यास उतरलेल्या तीन मजुरांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला होता. मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी दटके आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी एम्प्रेस मॉल परिसरात घोषणा दिल्या आणि गोंधळ माजवला.

रविवारी मृत मजुरांचे नातेवाईक त्यांच्या शवांसहित एम्प्रेस मॉल येथे पोहोचले. त्यावेळी मृतांच्या परिजनांना वाजवी नुकसानभरपाई मिळावी यासाठी नेत्यांनी मॉल प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मृत दीपक महादेव गवते (४५) सुगत नगर, मारोती गारोडी (४५) लाडपुरा आणि चंद्रशेखर जगोबाजी बारापात्रे (४३) रहिवासी नाईक तलाव बांगलादेश यांच्या मृतदेहांसमवेत त्यांच्या आप्तांनी एम्प्रेस मॉलमध्ये १० तास ठिय्या दिला. त्यांच्यासोबत माजी महापौर प्रवीण दटके, काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके, रमेश पुणेकर शिवसेना नेते सुरज गोजे तसेच इतर आरोपी सुरज ढबाले, नितीन मेश्राम, नितीन कानोरकर व ६०-७० आंदोलक देखील होते.

दरम्यान गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांसमवेत बोलणी केली असता त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

गणेशपेठ पोलिसांनी दटके, शेळके, पुणेकर आणि इतरांविरोधात भां. द. वि. च्या कलाम १४३, १४५, १४९, २९७, ३४१ अन्वये गुन्हे नोंदवले आहेत. त्याचप्रमाणे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली केएसएल समूहाचे संचालक आणि एम्प्रेस मॉलचे मालक प्रवीण तायल यांच्यासोबत मुख्य व्यवस्थापक एम्प्रेस मॉल, खुशबू अग्रवाल, त्यांचे सहायक कोमल रायजोडे, कामगार पर्यवेक्षक प्रदीप भावते आणि त्यांचे सहायक समीर भूमिराज ताकोने यांच्यावर भां. द. वि. च्या कलम ३०४ आणि ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.