Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Sep 11th, 2019

  राज्यातील प्रत्येक विद्यापीठ उत्कृष्टतेचे केंद्र बनावे -राज्यपाल

  मुंबई; राज्यातील प्रत्येक विद्यापीठातील कुलगुरुंनी स्वतः लक्ष घालून आपले विद्यापीठ हे उत्कृष्टतेचे केंद्र (Centre of excellence ) बनवावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले. राज्यातील विविध कुलगुरुंसमवेत आज राजभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आणि सर्व विद्यापिठांचे कुलगुरु उपस्थित होते.

  राज्यपाल पुढे म्हणाले, राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सर्व विद्यापिठाच्या कुलगुरुंनी विचार मंथन करून काही ठोस अशा सूचना कराव्यात. उत्तम विद्यार्थी आणि गुणवत्तापुर्ण शिक्षण अशी आपल्या राज्याची ओळख तयार व्हावी. प्राध्यापकांनी अधिक समरसतेने शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी योगदान द्यावे. नव्या विद्यापिठ कायद्यासंदर्भात काही अडचणी किंवा सुचना असल्यास त्याबद्दलही कुलगुरुंनी शासनाला कळवावे असेही ते म्हणाले.

  उपस्थित कुलगुरुंची ओळख करून दिल्यानंतर राज्यातील उच्च शिक्षणाची सद्यस्थिती बद्दल सांगतांना उच्च व तंत्र ज्ञान शिक्षणमंत्री श्री. तावडे म्हणाले, राज्यात नॅक कडून ‘अ’ दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांची संख्या ही 350 आहे तर 73 महाविद्यालये ही स्वायत्त आहे. उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. विद्यापिठ कायद्यात सन 2017 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. विद्यार्थी केंद्रीत निर्णयांचा यात समावेश करण्यात आला. राज्यातील काना कोप-यात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी क्लस्टर विद्यापिठ आणि स्वायत्त विद्यापिठांना चालना देण्यात आली. विद्यार्थ्यांना वेग वेगळे विषय एकाच वेळी शिकता यावे यासाठी निवड आधारीत विषय असलेले आंतर विषय पद्व्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. लवकरच पदवी आभ्यसक्रमात ही पद्धती सुरु करण्याचा शासनाचा मानस असल्याचे श्री तावडे यांनी सांगितले.

  यावेळी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सिद्धार्थ काणे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर, संत गाडगेबाबा अमवरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, कवी कुलगुरु संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्रीनिवास वराखेडी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु तसेच डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु श्रीमती डॉ.मृणालीनी फडणवीस, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उद्धव भोसले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.के.पी.विश्वनाथ, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.व्ही.एम.भाले, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.ए.एम.पातुरकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.ए.एस.धवन, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत उपस्थित होते.

  सर्व विद्यापिठातील कुलगुरुंच्यावतीने राज्यपालांना देवी सरस्वती यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145