Published On : Fri, Jan 26th, 2018

माझा आवाज बसला असला तरी भाजपाचा आवाज कोणी दाबू शकत नाही- मुख्यमंत्री

Advertisement

मुंबई- विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही तिरंगा रॅली काढली आहे. या रॅलीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या भाषणानं झाला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

माझा आवाज बसला असला तरी भाजपाचा आवाज कोणी दाबू शकत नाही, कोणाच्यात इतकी ताकद नाही. विरोधकांची संविधान बचाव रॅली नाही, तर पक्ष बचाव रॅली आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मुंबईतील विकास भाजपमुळे, भाजप गरिबांचा विकासासाठी काम करणारा पक्ष, त्यांच्या घरांसाठी भाजप प्रयत्न केले. संविधानात इतकी ताकद आहे की त्याच्याशी कोणी छेडछाड करू शकत नाही. संविधानानं लोकशाही जिवंत ठेवली, विरोधकांनी पक्ष बचाव रॅली काढली आहे.

महाराष्ट्रात ज्यांची दुकानदारी संपली, ते समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, आम्ही ते होऊ देणार नाही. हा आवाज भाजपचा आहे, आमचा आवाज बंद करण्याची कुणाचीही हिंमत नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं आहे. तिरंगा रॅली मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली होती. या रॅलीत मुंबईतील मंत्री, खासदार, आमदार देखील सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असून, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुपारी दोन वाजता सुरुवात झालेल्या या रॅलीचा समारोप हुतात्मा बाबू गेनू क्रीडांगण(कामगार मैदाना)वर झाला आहे. चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून रॅलीनं मार्गक्रमणाला सुरुवात केली होती.