Published On : Tue, Oct 9th, 2018

निष्पाप हिंदु कार्यकर्त्यांसाठी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते लढतात, हे कौतुकास्पद

Advertisement

मुंबई : आजचे निधर्मी असलेले शासन 100 निरपराध हिंदु फाशी गेले तरी चालतील; पण बेगडे निधर्मीत्व जपण्याचा प्रयत्न करत आहे. आज स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या शासनाच्या राज्यात हिंदू मार खात असून त्यांचे विविध स्तरांतून खच्चीकरण चालू आहे. हा देश हिंदूंचा असून आम्ही याला हिंदु राष्ट्र मानतो. हिंदूंचे राज्य असतांना सत्ताधारी राम मंदिराविषयी शब्द उच्चारायला सिद्ध नाहीत. आज राज्यापासून ते केंद्रापर्यंत भाजपची सत्ता असतांना राममंदिर उभारणीसाठी अध्यादेश का काढला जात नाही ? गेली 4 वर्षे सत्तेत असलेल्या आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या शासनाकडून समान नागरी कायद्यापासून ते राममंदिर उभारण्यापर्यंत अनेक सूत्रांमध्ये हिंदूंचा भ्रमनिरास झाला आहे.

आजच्या राज्यकर्त्यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व चालत नाही. आतंकवादी अजमल कसाब आणि याकूब मेमन यांना जर अधिवक्ता मिळू शकतो, तर हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या निष्पाप कार्यकर्त्यांसाठी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते लढतात, हे चुकीचे कसे ? अधिवक्ता पुनाळेकर यांनी अनेक हिंदूंचे निरपराधत्व सिद्ध केले असून त्यांनी त्यांचे कार्य पुढे असेच चालू ठेवावे, असे प्रतिपादन शिवसेनेचे संसद नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक खासदार श्री. संजय राऊत यांनी केले. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी हिंदुत्वासाठी केलेल्या भरीव कार्याच्या निमित्त आयोजित केलेल्या कृतज्ञतापर सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रीय पत्रकार मंचाच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी खासदार संजय राऊत यांच्या हस्ते अधिवक्ता पुनाळेकर यांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पहार, कृतज्ञतापत्र आणि श्रीकृष्णार्जुन रथाची प्रतिमा देऊन, तर परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा सत्कार भारताचार्य सु.ग. शेवडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अधिवक्ता धर्मराज चंडेल, राष्ट्रीय पत्रकार मंचाचे संयोजक श्री. अरविंद पानसरे आदी व्यासपिठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला अनेक अधिवक्ता, प्रतिष्ठित नागरिक आणि अनेक धर्मप्रेमी यांची उपस्थिती लाभली.

हिंदु राष्ट्र स्थापना होईपर्यंत परिषदेचे अधिवक्ते लढतच रहातील ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

अधिवक्ता संजीव पुनाळेकर कृतज्ञतापर सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, वर्ष 2008 मध्ये कथित हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करून अनेक निष्पाप हिंदूंना कारागृहात डांबण्यात आले. अशाप्रकारे कथित हिंदु आतंकवादाच्या नावाखाली अटक झालेले युवक निरपराध असतील, तर त्यांना आम्ही सोडवूच; पण जरी ते अपराधी असले, तरीही त्यांचे हिंदुत्व आणि हेतू यांविषयी शंका नसल्यामुळे आम्ही त्यांना विनामूल्य कायदेशीर साहाय्य देऊ, अशी हिंदु विधीज्ञ परिषदेची भूमिका आहे. परिषदेत असलेल्या अधिवक्त्यांपैकी कुणालाच राजकीय महत्त्वाकांक्षा नाही.

कित्येक अधिवक्ता राज्यकर्ते आणि कथित हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍या संघटना यांच्या दमनचक्राचे बळी ठरलेले असूनही निवळ धर्मसेवा म्हणून हिंदुत्वनिष्ठ युवकांच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत अन् पुढेही उभे रहातील. ज्याप्रमाणे कथित हिंदु आतंकवादाचा बुरखा फाडण्यात आला, त्याचप्रमाणे भ्रष्टाचारी, हिंदूंवर अन्याय आणि अत्याचार करणारे यांचे जोपर्यंत बुरखे फाडले जाणार नाहीत, तोपर्यंत अन् हिंदु राष्ट्र स्थापना होईपर्यंत परिषदेचे अधिवक्ते लढतच रहातील.

या वेळी भारताचार्य सु.ग. शेवडे म्हणाले की, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांचा हिंदु बांधवांनी आदर्श घेऊन आणि त्यांच्यासारखा सर्वस्वाचा त्याग करून हिंदुत्वाचे कार्य करावे. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले की, हिंदु विधीज्ञ परिषद ही चळवळ असून आमच्यावर हिंदु धर्म, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे ऋण असून ते फिटेपर्यंत आम्ही धर्माचे कार्य अखंड करत राहू.

याप्रसंगी हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य श्री. विक्रम भावे यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकूण समाजात कथित हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण होत असतांना अधिवक्ता पुनाळेकर यांनी केलेले कायदेशीर सहकार्य आणि दिलेला आधार यांविषयी अनुभवलेले क्षण व्यक्त केले. कार्यक्रमाचा प्रारंभ शंखनादाने करण्यात आला. श्री. अरविंद पानसरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, तर श्री. नित्यानंद भिसे यांनी आभार व्यक्त केले. गोवंश रक्षा समितीचे श्री. दीप्तेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.