नागपूर : शहरातील प्रमुख व्यापारी भाग असलेल्या इतवारी–गांधीबाग परिसरात कायमस्वरूपी लागणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
नागपूर वाहतूक पोलिसांनी काढलेल्या आदेशानुसार, २५ ऑगस्ट २०२५ ते २४ नोव्हेंबर २०२५ या काळात दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत ऑटो, ई-रिक्शा, चारचाकी तसेच जड वाहनांना प्रवेश बंदी राहणार आहे. या वेळेत फक्त दोनचाकी वाहने आणि पादचारी यांना प्रवेश दिला जाणार आहे.
वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी इतवारी अनाज बाजार, मस्कासात मार्ग, टांगा स्टँड मार्ग, गांधीबाग परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांना वन-वे घोषित करण्यात आले आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना केवळ सकाळी १० वाजण्यापूर्वी किंवा रात्री १० नंतरच प्रवेश मिळेल. होलकर चौक–गांधीबाग, शहीद चौक–इतवारी कपडा बाजार आणि रुईकर मार्गासह काही रस्त्यांवर एकमार्गी वाहतूक नियम लागू करण्यात आले आहेत.
याशिवाय बाजार परिसरात नो-पार्किंग झोन निश्चित करण्यात आले असून तेथे कोणतेही वाहन उभे करण्यास सक्त मनाई असेल. नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांना आवाहन केले आहे की, नव्या नियमांचे पालन केल्यास जामची समस्या कमी होईल, खरेदीदार आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण तयार होईल तसेच व्यापारालाही गती मिळेल. यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.