
नंदुरबार : राज्यात पुन्हा एकदा ‘बर्ड फ्लू’ने शिरकाव केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पोल्ट्री हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवापूरमध्ये या संसर्गाने पाय पसरल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी नवापूरमधील सहा पोल्ट्री फार्ममध्ये अचानक दीडशे ते दोनशे कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सतर्क झालेल्या फार्म मालकांनी तातडीने पशुसंवर्धन विभागाकडे धाव घेतली. प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते.
तपासणी अहवालात बर्ड फ्ल्यूची पुष्टी झाल्यानंतर जिल्हा प्रशासन तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आले आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रभावित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिसरात ‘कलिंग’ प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संसर्गित कोंबड्यांना सामूहिकरित्या नष्ट करण्यात येत आहे. या प्रक्रियेत सहकार्य न करणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
नवापूरसाठी बर्ड फ्ल्यूचे संकट नवे नाही. याआधीही दोन वेळा या भागात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव झाला होता. विशेषतः 2010 साली राज्यभरात लाखो कोंबड्यांची कत्तल करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा उद्भवलेल्या या संकटामुळे स्थानिक पोल्ट्री उद्योग धोक्यात आला आहे.
एकीकडे प्रशासन संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना, दुसरीकडे लाखो रुपयांचे नुकसान सहन करत पोल्ट्री व्यावसायिक हतबल झाले आहेत. हाता-तोंडाशी आलेला व्यवसाय डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होत असल्याने आता त्यांच्यासमोर नुकसानभरपाई आणि भविष्यातील सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.








