Published On : Sat, Jul 13th, 2019

पशूवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवा पशूपालकांपर्यंत पोहचणे गरजेचे -महादेव जानकर

Advertisement

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या राष्ट्रीय परिषदेचा समारोप

नागपूर: पशूवैद्यक क्षेत्राचा संतुलित प्रादेशिक विकास साधत असतांना विविध पशुवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवा पशुपालक, बेरोजगार तरुण व ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचे मत पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या वतीने पशुवैद्यक शास्त्रातील प्रगती तसेच शेतकऱ्यांची समृध्दता या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरु कॅप्टन प्रा. डॉ. एम. एम पातुरकर, अपर जिल्हाधिकारी तथा कुलसचिव चंद्रभान पराते, नियोजन आयोगाचे पूर्व सदस्य प्रा. डॉ. व्ही. व्ही. सदामते, आय.व्ही.ई.एफ. (इंडियन व्हेटरीनरी एक्सटेंशन फोरम) चे अध्यक्ष प्रा. डॉ. एस. राम कुमार, सरचिटणीस प्रा. डॉ. के. सी. वीरण्णा, नागपूर पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ आर. के. अंबाडकर, आय.व्ही.ई.एफ. आयोजन समितीचे सचिव डॉ. एस.पी. लांडगे तसेच कार्यशाळेला देशभरातून उपस्थित झालेले तज्ज्ञ, मान्यवर उपस्थित होते.

पशुवैद्यक शास्त्र आणि शेतीचा समन्वय या विषयावर मार्गदर्शन करतांना पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर म्हणाले, भारत देश कृषी प्रधान देश आहे. शेती हा देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. बव्हंशी ग्रामिण भारताचा डोलारा पारंपारिक शेती आणि त्याच्या पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. पारंपारिक पुरक व्यवसाय, त्या व्यवसायाच्या मर्यादा यामुळे शेतीला सहाय्य व्हावे तसे उत्पन्न मिळत नाही. यावर मात करण्यासाठी पशुवैद्यक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. पशूवैद्यक क्षेत्राचा संतुलित प्रादेशिक विकास साधत असतांना पशुवैद्यक क्षेत्रीतील उद्योजकतेच्या संधीची कवाडे युवा पशुपालक, बेरोजगार तरुण व ग्रामीण महिलांसाठी खुली करण्यासाठी राज्य शासन विविध धोरणांची अंमलबजावणी करीत आहे. कृषी विभागाचे राज्यामध्ये चार विद्यापीठे आहे. परंतु पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ राज्यात केवळ नागपूरला आहे. याचा विस्तार करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कृषी विभागाच्या धर्तीवर कुक्कुटपालन, मेंढी व शेळी पालन करणाऱ्या पशूपालकांना पशु व त्यांचे आजार, उपचार याबाबत माहिती देण्यासाठी एसएमएस प्रणाली विकसित करावी. पशुवैद्यक क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, शेती उपयोगी नवनवीन माहिती, नाविण्यपूर्व उपक्रम जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमोल पाटील यांनी तर आभार आयोजन समितीचे सचिव डॉ. एस. पी. लांडगे यांनी मानले.