Published On : Sat, Apr 4th, 2020

महाराष्ट्रात अखंडित व सुरळीत वीजपुरवठा ठेवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याचे ऊर्जामंत्र्यांनी दिले प्रधान ऊर्जा सचिवांना निर्देश

मुंबई – कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, रविवार 5 एप्रिल रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री नऊ वाजता संपूर्ण भारतात घरातील विजेचे दिवे बंद करून नऊ मिनिटांकरिता मेणबत्त्या, दिवे व मोबाईल टॉर्च लावण्यास जनतेला सांगितले आहे. त्यावेळी महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल ग्रीडची सुव्यवस्था व ग्रीडचा बिघाड (Failure) टाळण्यासाठी राज्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव यांना पत्राद्वारे दिले आहेत.

महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल ग्रीडची सुव्यवस्था व ग्रीडचा बिघाड (Failure) टाळण्यासाठी तसेच नागरिकांना अखंडीत, सुरळीत व पूर्ववत विजेचा पुरवठा ठेवण्याकरिता ऊर्जा विभाग, प्रामुख्याने महानिर्मीती, महापारेषण, महावितरण व राज्य भार प्रेषण केंद्र यांनी अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या सर्व केंद्रांच्या वरीष्ठ अधिका-यांना तातडीने निर्देश देण्यात यावेत असे राऊत यांनी प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

केंद्रीय ऊर्जा मंञी (स्वतंञ प्रभार) आर. के. सिंग यांनी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहना संदर्भात सविस्तर चर्चा केली. या आवाहनामध्ये पथदिवे, घरगुती उपकरणे जसे टि.व्ही., संगणक, फ्रिज आणि एअर कंडिशनर हे बंद करण्यात येणार नाहीत. फक्त घरातले लाईट/दिवे बंद करण्यात यावे असे म्हटले आहे.

5 एप्रिल रोजी रात्री एखादी आकस्मिक परिस्थिती उदभवल्यास महाराष्ट्रातील 2585 मेगावॅट स्थापित वीज क्षमतेच्या जलविदयुत केंद्रातून आपल्याला तात्काळ महत्तम विजनिर्मीती करता येईल, जेणेकरून उदभवलेल्या परिस्थतीत पश्चिम ग्रीडचे संतुलन राखणे सुकर होईल असे डॉ. राऊत यांनी सांगितले.