Published On : Thu, May 6th, 2021

Daya Nayak Transferred : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक साईडलाईन, थेट गोंदियात बदली

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक ( Daya Nayak) यांची बदली करण्यात आली आहे. दया नायक यांना दहशतवादी विरोधी पथकातून थेट गोंदियात पाठवण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे एटीएसमधून दया नायक यांची गोंदियाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र समिती येथे बदली करण्यात आली आहे. त्यामुळे दया नायक यांना साईडलाईन केल्याचं चित्र आहे. एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या दया नायक यांची बदली प्रशासकीय कारणास्तव केल्याचे सांगण्यात येत आहे. (Encounter specialist Daya Nayak Transferred from Maharashtra ATS Mumbai police to Gondia Caste Certificate Committee)

शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आलेल्या धमक्यांचा तपास
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांना धमक्या आल्याची चर्चा होती. त्याच्या तपासाचं कामसुद्धा दया नायक यांच्याकडेच होते. राज्यातील या बड्या नेत्यांना धमकी आल्याने त्याचा तपास एटीएसतर्फे दया नायक करत होते.या तपासासाठी त्यांना मुंबई बाहेर आणि राज्याच्या बाहेरही जावं लागलं होतं.


मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास
दरम्यान, मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एटीएसमार्फतही करण्यात येत होता. एटीएस मार्फत या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एकूण 6 टीम बनवण्यात आल्या आहेत. त्यातील जुहू एटीएसच्या टीमचे प्रभारी इन्चार्ज म्हणून दया नायक काम पाहत होते.

कोण आहेत दया नायक ?
>> मुंबई पोलिसमध्ये सध्या PI म्हणून कार्यरत असलेल्या दया नायक यांच्याकडे जुहू एटीएसची जबाबदारी आहे.

>> 1995 मध्ये दया नायक यांची महाराष्ट्र पोलीस फोर्समध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.

>> प्रदीप शर्मा यांच्यासोबत दया नायक यांनी क्राइम ब्रांचमध्ये काम सुरू केलं. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर स्कॉडमध्ये होते. 1998-99 पासून नायक एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.

>> 1996 साली दया नायक यांनी पहिला एन्काउंटर केला होता. आतापर्यंत जवळपास 80 एनकाउंटर दया नायक यांच्या नावावर आहेत.

>> दया नायक यांच्यावर अनेक आरोपही झाले आहेत. 2004 मध्ये दया नायक यांची चौकशी करण्यात आली होती.

>> बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत लिंक असल्याच्या आरोपावरून त्यांना पोलीस सेवेतून 2006 साली निलंबित करण्यात आलं. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ने त्यांना अटक केली होती.

>> 2012 साली दया नायक यांना सेवेत परत घेण्यात आलं. त्यानंतर त्यांची पोस्टिंग मुंबईत झाली. 2014 मध्ये नायक यांना नागपूरला पोस्टिंग मिळाली. पण ते नागपूरला गेले नाहीत. त्यामुळे त्यांना 2014 मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आलं होतं.

>> त्यानंतर पुन्हा नायक यांना 2016 मध्ये सेवेत घेण्यात आलं. सध्या दया नायक मुंबई एटीएसच्या जुहूचौकी युनिटचे प्रमुख आहेत.