Published On : Tue, Sep 5th, 2017

आव्हानांचा सामना करण्यास विद्यार्थ्यांना सक्षम बनवा -माया इवनाते

नागपूर: प्रतिकुल परिस्थितीतही आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना सुसंस्कारीत करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये उपजत गुण असतात. शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील प्रकट अवगुण आणि सुप्त गुण ओळखून त्याच्या व्यक्तीमत्वाला आकार द्यायला पाहिजे. आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्या यांना समोर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचे ध्येय शिक्षकांचे असावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या सदस्या श्रीमती माया इवनाते यांनी केले.

आदिवासी विकास विभागातर्फे ‘शिक्षक दिन व बालकांचे हक्क’ विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात. या योजना शिक्षकांनी पालक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविल्या पाहिजे. त्याचा विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी उपयोग होऊ शकतो. असेही त्या म्हणाल्या.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित कार्यशाळेला आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे, प्रमुख मार्गदर्शक बालरोग तज्ज्ञ डॉ. रवी भोन्सुले, उपायुक्त सुरेंद्र सावरकर, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण, सहाय्यक आयुक्त दीपक हेडावू, सहाय्यक प्रकल्प अधिकारी नयन कांबळे उपस्थित होते.

शिक्षक दिनानिमित्त आदिवासी विकास विभागातंर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळेकरिता उल्लेखनीय काम करणारे 31 मुख्याध्यापक व 42 शिक्षकांचा ग्रामगीता देऊन सन्मान करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते ‘बालकांचे हक्क’ पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे म्हणाल्या की, दुर्गम भागातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना घडविण्याचे अत्यंत कठीण काम शिक्षक करत आहे.

शिक्षकांचा करण्यात आलेला गौरव म्हणजे त्यांच्या कामाची पावती होय. शिक्षकांचे व्यक्तिमत्व जेवढे प्रभावी, परिणामकारक, ज्ञान समृद्ध असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. कारण पालक आणि शिक्षक यांच्या समन्वयातून उद्याची पिढी घडणार आहे. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन , सावित्रीबाई फुले यांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवल्यास दुर्गम आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थीही स्पर्धेत मागे पडणार नाहीत, असे डॉ. खोडे म्हणाल्या.

यावेळी बालरोग तज्ज्ञ डॉ. रवी भोन्सुले यांनी ‘बालकांचे हक्क’ विषयावर मार्गदर्शन केले तसेच मुख्याध्यापक, शिक्षकांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे संचालन रेणूका देशकर यांनी तर, आभार प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण यांनी मानले.