Published On : Fri, Aug 7th, 2020

सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांचा रोजगार निर्मितीत महत्त्वाचा सहभाग : नितीन गडकरी

Advertisement

फिकीच्या महिला संघटनेशी चर्चा

नागपूर: देशातील सूक्ष्म, मध्यम व लघु (एमएसएमई) उद्योगांचा रोजगार निर्मितीत महत्त्वाचा सहभाग असून यामुळे गरिबी निर्मूलनासही मदत झाली आहे. उद्योग क्षेत्राने दररोज नवीन संशोधन करणे आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘फिकी’च्या महिला संघटनेशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ना. गडकरी संवाद साधत होते. कोरोना संक्रमणाने सर्वांसमोरच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भीती आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. सकारात्मकता आणि आत्मविश्वासामुळे आपण यावरही मात करू असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- भारतीय अर्थव्यवस्था गतीने उदयास येणारी आहे. अशा स्थितीत अर्थव्यवस्थेस अधिक गती देण्यासाठी उद्योगांमध्ये सार्वजनिक खाजगी गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूक आणणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण उद्योगांचा विकास करून, रोजगार निर्मिती वाढविणे गरजेचे आहे. हे करताना ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या कृषी मालावर आधारित उद्योग निर्मिती, उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाचा वापर करून नवीन उत्पादनांची निर्मिती करण्यास प्राधान्य मिळावे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मागास भागाचा सामाजिक, आर्थिक विकास करताना आणि नवीन उद्योगांची निर्मिती करताना वाहतूक, ऊर्जा खर्च, मजुरांवर होणार्‍या खर्चात बचत करून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगातून मिळणार्‍या उत्पादनाच्या दर्जात कोणताही समझोता न करता हे ÷÷उत्पादन आंतरराष्ट्रीय दर्जाचे कसे होईल, याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- सतत अधिक संशोधन व आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन यासंदर्भात कोणताही समझोता उद्योगांनी करू नये. यामुळेच निर्यात वाढणार आहे व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी खेळते भांडवल उपलब्ध होईल. यादृष्टीनेच शासनाने एमएसएमईच्या व्याख्येत बदल केला असून त्याचा फायदा सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांना निश्चितपणे होईल. एमएसएमईमध्ये गुंतवणुकीच्या मर्यादा आणि उद्योगांच्या उलाढालीसाठी असलेल्या मर्यादांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांना उद्योगांमध्ये गुंतवणुकीच्या संधी आणि उद्योगांचा आवाका वाढणार आहे.

तसेच राष्ट्रीय महामार्ग मागास असलेल्या ग्रामीण, आदिवासी भागातून जात आहेत. या राष्ट्रीय महामार्गाशेजारी असलेल्या मोकळ्या जागांचा विकास करून त्या ठिकाणी नवीन उद्योगांचे समूह निर्माण करणे, स्मार्ट गावे, स्मार्ट शहरांचे निर्माण करणे, या नवीन विकसित जागा बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, विमानतळांशी जोडणे, यामुळे नवीन गावांची निर्मिती होईल. शहराकडील गर्दी कमी होऊन मागास ग्रामीण, आदिवासी भागाचा विकास होईल व रोजगार निर्मिती होईल, यादृष्टीनेही आगामी काळात आपले प्रयत्न असले पाहिजेत असेही ना. गडकरी म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement