Published On : Tue, Apr 4th, 2017

वर्धा जिल्ह्यातील सिंदी येथील शेतकऱ्यांची कापूस विक्रीची थकित रक्कम तातडीने द्यावी

मुंबई: वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सेलू उप बाजारपेठ कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीची थकित रक्कम येत्या दहा दिवसांत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

सिंदी बाजार समितीच्या उप बाजारपेठेच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या देय रकमेबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार पंकज भोयर, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, वित्त विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सेलू कार्यक्षेत्रातील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची कापूस खरेदी केली होती. तथापि, खरेदी केलेल्या कापसाची रक्कम दिली नव्हती. या शेतकऱ्यांच्या थकित रक्कम देण्यासंबंधी आज या बैठकीत चर्चा झाली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीची रक्कम त्यांना देणे आवश्यक आहे. त्यासाठी वित्त विभाग व पणन विभागाने तातडीने मार्ग काढावा. तसेच एकूण किती रक्कम देय आहे, याची छाननी करून जिल्हाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावा.