Published On : Tue, Jun 7th, 2022
By Nagpur Today Nagpur News

जास्तीत जास्त कोरोना चाचणीवर भर द्या : मनपा आयुक्त

Advertisement

विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही होणार चाचणी

नागपूर: नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या हळुहळु वाढत आहे. त्यादृष्टीने सुरक्षात्मक उपाययोजना आवश्यक असून कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्याकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जास्तीत जास्त कोरोना चाचणीवर भर देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे.

Gold Rate
17 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,32,900/-
Gold 22 KT ₹ 1,23,600 /-
Silver/Kg ₹ 2,01,200/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दिल्ली आणि मुंबई येथून विमानाने येणाऱ्या प्रवाशांनी तसेच त्यांच्या संपर्कात येणा-या नागरिकांनी चाचणी करण्याचेही निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव घरी असलेले ज्येष्ठ नागरिक, आजारी नागरिकांना व लहान मुलांना होणार नाही. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार आरोग्य विभागाद्वारे बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजार अशा सर्व गर्दीच्या ठिकाणी सुपर स्पेडर्स ठरणा-या व्यक्तींच्या चाचणीवरही भर देण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांवर सुद्धा प्रवाश्यांची चाचणी केली जाणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे. तसेच त्यांनी गर्दीच्या ठिकाणी किंवा समारंभात मास्कचा वापर करणे, शारिरिक अंतर ठेवण्याचे आवाहन केले.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मंगळवारी (ता.७) मनपा मुख्यालयातील कोरोना वॉर रूमध्ये आरोग्य विभागाची एक महत्वाची बैठक घेण्यात आली. बैठकीत आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी., अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. भावना सोनकुसळे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अतिक खान, डॉ. विजय तिवारी, डॉ. शुभम मनगटे, डॉ. सागर नायडू यांच्यासह इतर झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी आयुक्तांनी सर्व झोनमध्ये कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचावाच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. वाढत्या संसर्गाच्या साखळीवर वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वप्रथम कोरोना संशयीत तसेच लक्षणे आढळणा-या व्यक्तींची चाचणी करणे आवश्यक असून त्यांची आर.टी.पी.सी.आर. चाचणी करण्यात यावी आणि बाजारपेठेत रॅपिड अँटीजेन चाचणी केली जावी. रुग्णालयात तपासणीसाठी येणा-या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात यावी. कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रवासाची पार्श्वभूमी लक्षात घेउन त्यांची सर्व ट्रॅव्हल हिस्ट्री काढण्यात यावी. त्यांच्या संपर्कातील सर्व निकटवर्तीयांची चाचणी करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले. पुढील संभाव्य धोक्याचा सामना करण्याच्या दृष्टीने मनपाची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज करून हॉस्पीटल्स, वैद्यकीय कर्मचारी, ऑक्सिजन प्लांट, औषधे आदी सर्व सुस्सज करण्याचेही निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले. कोरोना वर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. युवकांचे १२ वर्षावरील मुलांचे लसीकरण आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या बुस्टर डोससाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत. ज्या नागरिकांनी कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेला नाही त्यांना दोन्ही डोस घेउन लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले. शाळा, महाविद्यालयात शिबिरे आयोजित करुन विद्यार्थ्यांना नर्सेस, डॉक्टरकडून नि:शुल्क लसीकरण करावे.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मनपा आरोग्य विभाग आणि प्रशासन पूर्णत: सज्ज झाले आहे. नागपूर शहरातील विविध भागांमध्ये सध्या ३६ केंद्रांवर कोरोना चाचणी केली जात आहे. कुणालाही सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास त्यांनी मनपाच्या कोरोना चाचणी केंद्रावरून नि:शुल्क चाचणी करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले.

सध्या नागपुरात ९९ टक्के पेक्षा जास्त नागरिकांनी कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा पहिला डोस आणि ७९ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

शहरात १८ वर्षावरील वयोगटात १०४ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला असून ८४ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच १५ ते १७ वर्ष वयोगटातील ६६ टक्के पात्र व्यक्तींनी पहिला डोस घेतला असून ५० टक्के यांनी दुसरा डोस घेतला आहे. १२ ते १४ वर्ष वयोगटामध्ये ३९ टक्के मुलांनी पहिला आणि १७ टक्के मुलांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच १८ ते ५९ वयोगातील ६०२८ नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

नागपूर शहराची लोकसंख्या २६८५८३५ एवढी असून लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या २१,८९,०२५ एवढी आहे. यापैकी पहिला डोस २१,७२,०१४ नागरिकांनी आणि १७,३४,६२५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे पात्र नागरिकांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन स्वतःला सुरक्षित करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement